मुंबई : बहुचर्चित रिअॅलिटी शो ‘बिग बॉस २०’चा ग्रँड प्रीमियर रविवारी, ६ सप्टेंबर रोजी दिमाखात पार पडला. सलमान खानच्या दमदार अंदाजात सुरू झालेल्या या नव्या सीझनमध्ये मनोरंजन, क्रीडा, संगीत आणि डिजिटल क्षेत्रातील तब्बल १७ स्पर्धकांनी ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला आहे.
सलमानचा खास अंदाज
बॉलिवूडमध्ये ३८ वर्षांचा प्रवास पूर्ण केल्याच्या निमित्ताने सलमान खानने आपल्या २० गाजलेल्या गाण्यांवर धमाकेदार परफॉर्मन्स सादर करत प्रीमियरची सुरुवात केली. त्याच्या या खास अंदाजाने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली.
या सोहळ्यात भोजपुरी स्टार दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ आणि अभिनेते मनोज तिवारी यांनीही विशेष उपस्थिती लावली. मनोज तिवारी यांची मुलगी रीति तिवारी यंदा ‘बिग बॉस २०’ची स्पर्धक म्हणून घरात दाखल झाली आहे.
मॅरी कॉमपासून सोशल मीडिया स्टार्सपर्यंत
यंदाच्या सीझनमध्ये विविध क्षेत्रांतील प्रसिद्ध चेहरे सहभागी झाले आहेत. भारताची दिग्गज ऑलिम्पियन बॉक्सर एम. सी. मॅरी कॉमच्या प्रवेशाने विशेष लक्ष वेधून घेतले. तिच्यासाठी अभिनेत्री प्रियंका चोप्राने खास व्हिडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या.
भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबे, टीव्ही अभिनेत्री माही विज, कनिका मान, उदिती सिंह, ईशा रिखी आणि ‘पंचायत’ फेम आसिफ खान यांचाही स्पर्धकांमध्ये समावेश आहे.
याशिवाय अरिश्फा खान, अमन गांधी, लव्ह गिल, रोहेद खान, गायक काझी अहमद तौकीर, रॅपर हर्ष मचारे उर्फ Yung DSA, गेमिंग स्टार तन्मय सिंह उर्फ ScoutOP आणि कुशल तंवर उर्फ गुल्लू यांनीही बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे.
‘वरदान’ थीममुळे खेळात येणार ट्विस्ट
‘बिग बॉस २०’ची यंदाची थीम ‘वरदान’ अशी आहे. या थीमअंतर्गत स्पर्धकांना दोन ‘एक्स्ट्रा जीवन दान’ म्हणजेच अतिरिक्त लाइफलाईन्स मिळणार आहेत. त्यामुळे स्पर्धेच्या दरम्यान कोणत्याही क्षणी खेळाचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे.
‘जिओ हॉटस्टार’ आणि ‘कलर्स टीव्ही’वर सुरू झालेल्या या नव्या सीझनमध्ये स्पर्धकांमधील मैत्री, मतभेद, वाद आणि रणनीती कशा रंगतात, याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.