Skip to content
Menu

कॅब चालकाकडून महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; नवी मुंबई विमानतळाजवळ धक्कादायक घटना

September 7, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर रात्रीच्या वेळी कॅब चालकाने महिला प्रवाशासोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निर्जन रस्त्यावर कॅब थांबवल्यानंतर चालकाने मागील सीटवर बसलेल्या महिलेच्या शेजारी जाऊन तिचा हात पकडला आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिलेने आरडाओरड करत विरोध केल्यानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला.

या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून नवी मुंबई विमानतळ पोलिसांनी मोहम्मद अफजल शेख याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पार्टीवरून घरी जात असताना प्रकार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या मित्रांसोबत चेंबूर येथे पार्टीसाठी गेली होती. रात्री घरी परतताना तिच्या एका मित्राने कॅब बुक केली होती. ही कॅब महिलेला पनवेल येथील तिच्या घरी सोडण्यासाठी निघाली.

रात्री सुमारे एकच्या सुमारास कॅब नवी मुंबई विमानतळाजवळील एअरपोर्ट सर्व्हिस रोडवर पोहोचली. त्यावेळी हा रस्ता तुलनेने निर्जन होता. चालकाने अचानक कॅब थांबवली. पाणी पिण्यासाठी खाली जात असल्याचे सांगून तो काही वेळ बाहेर गेला.

महिलेने आरडाओरड करत केला प्रतिकार

काही वेळाने चालक पुन्हा कॅबमध्ये आला. मात्र, चालकाच्या सीटवर न बसता तो थेट मागील सीटवर महिलेच्या शेजारी जाऊन बसला. त्याने महिलेचा हात पकडून तिच्या कपड्यांना हात घालत ते काढण्याचा प्रयत्न केल्याचे तिने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने जोरात आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तिने चालकाचा प्रतिकार करत कॅबमधून बाहेर पडण्यात यश मिळवले. त्यानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला. हा प्रकार रात्री सुमारे दीडच्या सुमारास घडल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले.

तक्रारीसाठी पनवेलहून विमानतळ पोलिस ठाण्यात

घटनेनंतर महिलेने तातडीने आपल्या कुटुंबीयांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला आणि त्यानंतर ती घरी पोहोचली. पुढे तक्रार दाखल करण्यासाठी ती पनवेल पोलीस ठाण्यात गेली.

मात्र, घटना ज्या ठिकाणी घडली ते नवी मुंबई विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पनवेल पोलिसांनी महिलेला आपल्या वाहनातून विमानतळ पोलिस ठाण्यात नेले. महिलेचा जबाब नोंदवून तिच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.