Skip to content
Menu

माध्यमांशी बोलत असताना विद्यानंद बापट यांना मारहाण

September 3, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या

पुणे : गणेशोत्सव आणि सार्वजनिक उत्सवांमध्ये DJ व लाऊडस्पीकरच्या मोठ्या आवाजाला विरोध करणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना मारहाण झाल्याची घटना पुण्यात घडली. माध्यमांशी संवाद साधत असतानाच काही तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांकडून घटनेची चौकशी सुरू आहे.

गणेशोत्सव तसेच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये DJ आणि लाऊडस्पीकरच्या वापरावर निर्बंध असावेत, अशी मागणी बापट गेल्या काही दिवसांपासून करत आहेत. याच मुद्द्यावर ते एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना काही तरुणांनी त्यांना अडवून मारहाण केल्याचे समोर आले आहे.

‘माझी भूमिका पटली नसावी’

घटनेनंतर बापट यांनी सांगितले की, ते माध्यमांशी बोलत असताना काही तरुणांनी अचानक येऊन त्यांना बोलण्यापासून रोखले. आपली भूमिका त्यांना मान्य नसल्याने हा प्रकार घडला असावा, असा दावा त्यांनी केला.

“मी माध्यमांशी बोलत असताना निशस्त्र होतो. त्याचा फायदा घेत मला बोलण्यापासून रोखण्यात आले आणि मारहाण करण्यात आली. मुद्द्यांना मुद्द्यांनी उत्तर देता येत नसल्याने अशा प्रकारे विरोध केला जात आहे,” असे बापट यांनी सांगितले.

या घटनेचे चित्रीकरण कॅमेऱ्यात झाले असून संबंधित व्हिडीओच्या आधारेही तपास केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

‘गणेशोत्सवाला माझा विरोध नाही’

आपला गणेशोत्सवाला किंवा धार्मिक उत्सवाला विरोध नसल्याचेही बापट यांनी स्पष्ट केले. मात्र, उत्सवांच्या नावाखाली DJच्या मोठ्या आवाजाला आपला विरोध असल्याचे त्यांनी सांगितले.

“मला सवंग प्रसिद्धीची गरज नाही. मी माझी भूमिका मांडत राहणार आहे. या प्रकाराकडे मी दुर्लक्ष करतो,” असेही त्यांनी म्हटले.

प्रशांत जगतापांकडून घटनेचा निषेध

या घटनेनंतर पुण्यातून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांनी बापट यांच्यावर झालेल्या मारहाणीचा निषेध केला.

बापट हे धार्मिक सणांच्या विरोधात नसून DJच्या माध्यमातून वाढत असलेल्या मोठ्या आवाजाला विरोध करत असल्याचे जगताप यांनी म्हटले. या मुद्द्यावर भूमिका मांडल्यामुळे त्यांच्यावर थेट हात उचलण्यापर्यंत परिस्थिती गेल्याचा आरोप करत त्यांनी सत्ताधारी भाजपवरही टीका केली.

पुण्यात चुकीच्या प्रवृत्तींना राजकीय पाठबळ मिळत असल्याचा आरोप जगताप यांनी केला. मात्र, या आरोपांवर संबंधित भाजप नेत्यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान, मारहाणीच्या या घटनेमागील नेमके कारण आणि हल्लेखोरांची ओळख याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे.