मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारच्या पातळीवर हालचालींना वेग आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा अकरावा दिवस सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मध्यरात्रीपर्यंत महायुतीतील प्रमुख नेत्यांची बैठक झाली. मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि त्यातून निर्माण झालेली परिस्थिती यावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर अद्याप तोडगा निघालेला नाही. गेल्या काही दिवसांत सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. मात्र, मागण्या मान्य न झाल्याने जरांगे यांनी मुंबईत येऊन पुन्हा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर ‘वर्षा’वरील बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
रात्री दोन वाजेपर्यंत बैठक
सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेली बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. तब्बल रात्री दोन वाजता बैठक संपल्याचे सांगण्यात येत आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी समाजाच्या आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही, याबाबतही बैठकीत विशेष चर्चा झाल्याचे समजते.
या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उदय सामंत, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रविंद्र चव्हाण आणि आमदार प्रसाद लाड आदी नेते उपस्थित होते.
मात्र, बैठकीत नेमके कोणते निर्णय घेण्यात आले किंवा आरक्षणाच्या प्रश्नावर कोणता तोडगा काढण्याबाबत चर्चा झाली, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
जरांगेंची प्रकृती खालावली
दरम्यान, अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरूच आहे. सलग अनेक दिवस अन्नत्याग केल्याने त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती आहे. रात्री अडीचच्या सुमारास त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. रक्तातील साखर आणि रक्तदाब कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रकृती खालावल्यानंतर मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. सकाळपासून सरकारकडून कार्यवाही सुरू करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर जरांगे यांनी सलाईन घेतल्याची माहिती आहे. मात्र, सर्व मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे न घेण्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे.
आंदोलकांकडून महामार्गावर आंदोलन
जरांगे यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आल्यानंतर मध्यरात्री मराठा आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्गावर आंदोलन केले. काही ठिकाणी टायर जाळून रस्ता रोखण्यात आला. त्यामुळे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नाशिकमध्ये आज राज्यस्तरीय बैठक
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर नाशिकमध्ये आज राज्यस्तरीय बैठक होणार आहे. विविध मराठा संघटनांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
SEBC आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा संघटना पुन्हा आक्रमक झाल्या आहेत. कुणबी नोंद नसलेल्या मराठा समाजातील व्यक्तींना SEBCच्या माध्यमातून आरक्षण मिळावे आणि हे आरक्षण कायम ठेवावे, अशी संघटनांची मागणी आहे. सरकारकडून SEBC आरक्षणाबाबत बदल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही काही संघटनांकडून करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर नाशिकमधील बैठकीत कोणती भूमिका घेतली जाते आणि पुढील आंदोलनाची दिशा काय ठरते, याकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.