नागपूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आंदोलकांशी चर्चेची भूमिका कायम ठेवली आहे. संविधानाच्या चौकटीत बसणाऱ्या, कायदेशीर असलेल्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा भंग न करणाऱ्या मागण्यांवर सरकार चर्चा करण्यास तयार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
नागपुरात रविवारी पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, सरकारचे प्रतिनिधी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांशी संवाद साधत आहेत. यापूर्वीही चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढण्यात आला आहे. त्यामुळे यापुढेही चर्चेतून तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुरुवातीपासूनच या प्रश्नावर संवेदनशीलतेने काम करत असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. आंदोलकांच्या ज्या मागण्या कायदेशीर आणि संविधानाच्या चौकटीत असतील, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशी विसंगत नसतील, त्यावर सरकार चर्चा करण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
समृद्धी महामार्गावरील दरोड्याची गंभीर दखल
समृद्धी महामार्गावर प्रवाशांवर झालेल्या दरोड्याच्या घटनेची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी पोलीस महासंचालकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष टास्क फोर्सच्या माध्यमातून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
महामार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार असून, या घटनेचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रेस्क्यू सेंटरमध्ये आफ्रिकन सफारीची तयारी
नागपूरजवळील प्राणीसंग्रहालय आणि रेस्क्यू सेंटरच्या विकासाबाबतही फडणवीस यांनी माहिती दिली. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकल्पाच्या विकासासाठी प्रयत्न सुरू असून, रेस्क्यू सेंटरनंतर इंडियन सफारी सुरू करण्यात आली आहे. आता पुढील वर्षी आफ्रिकन सफारी सुरू करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
या सफारीमध्ये ‘बिग फाईव्ह’ म्हणून ओळखले जाणारे प्राणी आणण्याची योजना आहे. वन्य पर्यटनासोबतच वन्यजीव संवर्धन, उपचार आणि प्रशिक्षणाच्या दृष्टीने हे केंद्र महत्त्वाचे ठरत असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.
‘हिंदुत्वाचा आत्मा सहिष्णुता’
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर थेट भाष्य करण्याचे टाळत फडणवीस यांनी हिंदुत्वाच्या सहिष्णुतेच्या भूमिकेचे समर्थन केले. सर्वांना सोबत घेऊन जाणे आणि सर्व धर्मांचा सन्मान करणे ही हिंदुत्वाची शिकवण असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र सहिष्णुतेचा अर्थ अन्याय सहन करणे असा नसून, कोणी हल्ला केल्यास त्याचा प्रतिकार केला पाहिजे. हिंदुत्वाची भूमिका मात्र स्वतःहून हल्ला करण्याची नसून सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.