Skip to content
Menu

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार 28 सप्टेंबरला दौऱ्यावर

September 21, 2026
महाराष्ट्र

मुंबई : राज्यातील अनेक भागांत पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी, शेतमजूर आणि पशुधनासमोर अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार 28 सप्टेंबरला राज्यातील दुष्काळी भागांचा दौरा करणार आहेत.

शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 50 हजार रुपये आणि शेतमजूर कुटुंबांना प्रत्येकी 25 हजार रुपयांची मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

पावसाअभावी सोयाबीन, कापूस, बाजरी, मका, तूर, मूग आणि उडीद यांसारख्या पिकांवर परिणाम झाल्याचे पवारांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. याशिवाय कर्जमाफी, पीककर्जाची उपलब्धता, पीकविमा, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर आणि गरजेनुसार चारा छावण्या सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

आता प्रत्यक्ष दुष्काळी भागात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत परिस्थितीची पाहणी करण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे. या दौऱ्यात ते शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेणार असून, त्यानंतर सरकारकडे कोणत्या उपाययोजनांची मागणी केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही दुष्काळी भागांचा दौरा सुरू केला असून, चारा छावण्या आणि शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी केली आहे.

28 सप्टेंबरलाच पक्षाची राज्यस्तरीय बैठक

शरद पवारांच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यासोबतच 28 सप्टेंबरला मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची राज्यस्तरीय बैठकही होणार आहे. वाय. बी. चव्हाण सेंटर येथे होणाऱ्या या बैठकीत दुष्काळ आणि पाणीटंचाईसह बेरोजगारी, पेपरफुटी, SIR, राज्यातील राजकीय परिस्थिती आणि पक्षाच्या संघटनात्मक वाढीबाबत चर्चा होणार आहे.

प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून, पक्षाचे खासदार, आमदार, पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.