Skip to content
Menu

दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वाहतुकीत बदल वांद्रे, घाटकोपरमध्ये निर्बंध; गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांचा विशेष बंदोबस्त

September 5, 2026
महाराष्ट्र

मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. गोविंदा पथकांसह नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. काही प्रमुख मार्गांवर ठरावीक वेळेत वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

जरीमरी रोडवर सहा तास वाहतूक बंद

वांद्रे येथील जरीमरी रोडवर दहीहंडी कार्यक्रमासाठी स्टेज उभारण्यात येणार असल्याने सायंकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत या मार्गावर वाहतुकीला निर्बंध असतील.

एस. व्ही. रोडवरून हिल रोडच्या दिशेने जरीमरी रोडमार्गे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. वाहनचालकांनी विठ्ठल मंदिर सिग्नलवरून यू-टर्न घेऊन एस. व्ही. रोडने उत्तरेकडे जावे. त्यानंतर डॉ. व्ही. आर. रघुनाथ मार्ग आणि सेंट मार्टिन रोडमार्गे हिल रोडकडे जाता येणार आहे.

घाटकोपरमध्ये दक्षिण वाहिनी बंद

घाटकोपर पश्चिमेकडील टिळकवाडी आणि साईनाथनगर परिसरात मोठ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवरील श्रेयस जंक्शन ते भीमनगर जंक्शनदरम्यानची दक्षिण वाहिनी सकाळी ७ ते रात्री ११.३० वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांना या मार्गावरून प्रवेश करता येणार नाही. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

गोविंदांच्या सुरक्षेसाठीही विशेष काळजी

दहीहंडीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने पोलिसांकडून गर्दी नियंत्रणासह कायदा-सुव्यवस्थेवर लक्ष ठेवले जाणार आहे. मनोरे उभारताना पावसामुळे रस्ते निसरडे झाल्यास अतिरिक्त खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मनोऱ्याच्या परिसरात अनावश्यक गर्दी होऊ नये, तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी, यासाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.