Skip to content
Menu

ड्रोन हल्ल्यानंतर सौदीची तेल पाइपलाइन बंद

September 12, 2026
देश-विदेश

होर्मुझ मार्ग बंद झाल्यानंतर दररोज ५० लाख बॅरल तेलाची वाहतूक याच पाइपलाइनमधून

रियाध : ड्रोन हल्ल्यानंतर सौदी अरेबियाने आपली महत्त्वाची ईस्ट-वेस्ट तेल पाइपलाइन तात्पुरती बंद केली आहे. गुरुवारी झालेल्या हल्ल्यात पाइपलाइनशी संबंधित एका पंपिंग स्टेशनला आग लागली. या घटनेत काही जण जखमी झाल्याची माहिती आहे.

सौदीच्या ऊर्जा मंत्रालयाने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, पाइपलाइनवर अनेक ड्रोन हल्ले करण्यात आले. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पाइपलाइनमधून तेलाची वाहतूक थांबवण्यात आली. पाइपलाइनची सुरक्षा आणि हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी संबंधित पथके काम करत आहेत.

या हल्ल्यामागे नेमके कोण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच कोणत्याही देशाने किंवा संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

पंपिंग स्टेशनला आग

अमेरिकन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ड्रोनद्वारे पाइपलाइनजवळील पंपिंग स्टेशनना लक्ष्य करण्यात आले. पाइपलाइनमधून तेल पुढे पाठवण्याच्या प्रक्रियेत या स्टेशनची महत्त्वाची भूमिका असते.

शुक्रवारी मिळालेल्या उपग्रह छायाचित्रांमध्ये एका पंपिंग स्टेशनला मोठ्या प्रमाणावर आग लागल्याचे दिसून आले. दुसऱ्या छायाचित्रात स्टेशनमधून मोठ्या प्रमाणात काळा धूर निघताना दिसत आहे. मात्र, या हल्ल्यामुळे संपूर्ण पाइपलाइनचे किती नुकसान झाले आहे आणि ती पुन्हा कधी सुरू होईल, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

सौदीचा दावा; इराकमधून आले ड्रोन

सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाने केलेल्या दाव्यानुसार, रियाध आणि मदिना परिसरातील पाइपलाइनवर अनेक ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आले. हे ड्रोन इराकमधून आले असल्याचे सौदीने म्हटले आहे.

इराकचे पंतप्रधान यांच्या विनंतीनंतर सध्या प्रतिहल्ला न करण्याचा निर्णय घेतल्याचेही सौदीकडून सांगण्यात आले. इराकने आपल्या भूमीतून होणारे असे हल्ले रोखण्यासाठी कारवाई करावी, अशी अपेक्षा सौदीने व्यक्त केली आहे.

दरम्यान, इराकने या हल्ल्याचा निषेध केला असून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. आपल्या भूमीचा किंवा हवाई क्षेत्राचा वापर इतर देशांवर हल्ला करण्यासाठी होऊ दिला जाणार नाही, असे इराक सरकारने स्पष्ट केले आहे.

होर्मुझ बंद झाल्यानंतर पाइपलाइन ठरली महत्त्वाची

सौदी अरेबियातील बहुतांश तेलाचे उत्पादन देशाच्या पूर्व भागात होते. सामान्य परिस्थितीत हे तेल परदेशात पाठवण्यासाठी जहाजांचा वापर केला जातो. मात्र, पर्शियन आखातातून बाहेर पडण्यासाठी जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जावे लागते.

इराणसोबतच्या संघर्षामुळे होर्मुझचा मार्ग बंद झाल्यानंतर सौदीसमोर तेल निर्यातीचे मोठे आव्हान निर्माण झाले. त्यामुळे देशाने पूर्व-पश्चिम पाइपलाइनचा वापर वाढवला.

ही पाइपलाइन सौदीच्या पूर्व भागातून थेट पश्चिम किनाऱ्यावरील यानबू बंदरापर्यंत तेल पोहोचवते. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजे नेण्याची गरज राहत नाही.

होर्मुझ मार्ग बंद झाल्यानंतर या पाइपलाइनमधून दररोज सुमारे ५० लाख बॅरल तेल यानबू बंदरापर्यंत पाठवले जात होते. तेथून पुढे जहाजांच्या माध्यमातून हे तेल इतर देशांमध्ये निर्यात केले जाते.