नवी दिल्ली : २८ सप्टेंबरपासून देशभरात पुकारण्यात आलेला बँक कर्मचाऱ्यांचा तीन दिवसांचा संप तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) यांच्यात रविवारी रात्री झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे बँक ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
UFBUने २७ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकातून संप स्थगित केल्याची माहिती दिली. रविवारी रात्री साडेनऊ वाजता IBA आणि UFBUच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर प्रस्तावित तीन दिवसांचा देशव्यापी संप पुढे ढकलण्यावर दोन्ही बाजूंमध्ये सहमती झाली.
उर्वरित शनिवारच्या सुट्टीसाठी समिती स्थापन
बँकिंग क्षेत्रात उर्वरित शनिवार सुट्टीचा दिवस म्हणून जाहीर करण्याच्या मागणीवरही बैठकीत चर्चा झाली. या विषयावर तोडगा काढण्यासाठी IBA आणि UFBUची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही समिती या मागणीसंदर्भातील उपलब्ध पर्यायांचा अभ्यास करणार असून संबंधित घटकांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे.
PLI योजनेवरही चर्चा
स्केल IV आणि त्यापुढील श्रेणीतील बँक अधिकाऱ्यांसाठी प्रस्तावित परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेचाही बैठकीत मुद्दा उपस्थित करण्यात आला. या योजनेबाबत IBAसोबत पुढील चर्चा करण्याचे ठरले आहे.
तसेच बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संघटनांनी PLI योजनेबाबत व्यक्त केलेल्या आक्षेपांचा विचार करून त्यात आवश्यक बदल करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे संप स्थगित झाल्याने सध्या बँकिंग सेवा सुरळीत राहण्याची शक्यता आहे.