नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने १२७ धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयाचा केंद्रबिंदू ठरला तो सलामीवीर अभिषेक शर्मा. त्याने अवघ्या ३५ चेंडूंत १०८ धावांची आक्रमक खेळी करत मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. या खेळीदरम्यान अभिषेकने एकाच सामन्यात अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्यापासून ते सर्वाधिक वेगवान भारतीय शतकापर्यंत अभिषेकने अनेक विक्रम मोडले. त्याने टी-२० क्रिकेटमधील शतकांच्या बाबतीत विराट कोहलीचीही बरोबरी केली.
१. पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम
अभिषेकने सामन्याच्या पहिल्या सहा षटकांत केवळ २२ चेंडूंचा सामना करत नाबाद ७६ धावा केल्या. पुरुषांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पॉवरप्लेमध्ये एखाद्या फलंदाजाने केलेली ही सर्वाधिक धावसंख्या ठरली. पोर्तुगालच्या कुलदीप घोलियाने यापूर्वी ७४ धावा केल्या होत्या.
२. भारतीयांचा सर्वात वेगवान शतकाचा विक्रम
अभिषेकने ३० चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. त्यामुळे रोहित शर्माचा २०१७ मधील ३५ चेंडूंतील शतकाचा भारतीय विक्रम मागे पडला.
या कामगिरीसह पूर्ण सदस्य देशांमधील टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतकाचा विक्रमही अभिषेकच्या नावावर झाला. यापूर्वी झिम्बाब्वेचा सिकंदर रझा आणि न्यूझीलंडचा फिन ॲलन यांनी ३३ चेंडूंमध्ये शतक केले होते.
३. विराट कोहलीच्या शतकांची बरोबरी
अभिषेकच्या टी-२० कारकिर्दीतील शतकांची संख्या आता १० झाली आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या टी-२० सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत त्याने विराट कोहलीची बरोबरी केली आहे.
४. भारताची २०० प्लस धावांची ५३वी खेळी
अफगाणिस्तानविरुद्ध भारताने २० षटकांत सात गडी गमावून २२१ धावा केल्या. टी-२० क्रिकेटमध्ये भारताने २०० किंवा त्यापेक्षा जास्त धावसंख्या उभारण्याची ही ५३वी वेळ ठरली. दक्षिण आफ्रिकेने अशी कामगिरी ३१ वेळा केली आहे.
५. १०० धावांनी विजयाची दहावी नोंद
भारताने अफगाणिस्तानचा १२७ धावांनी पराभव करत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० किंवा त्यापेक्षा जास्त धावांनी विजय मिळवण्याची दहावी नोंद केली. या विक्रमात भारताने कॅनडाची बरोबरी केली आहे.
६. पॉवरप्लेमध्ये प्रथमच १०० धावा
भारताने या सामन्यात पहिल्या सहा षटकांत एकही गडी न गमावता तब्बल १०० धावा केल्या. भारतीय टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पॉवरप्लेमध्ये १०० धावांचा टप्पा गाठण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
यापूर्वी २०२५ मध्ये इंग्लंडविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर भारताने एका गडीच्या मोबदल्यात ९५ धावा केल्या होत्या.
७. अभिषेकचे सहावे वेगवान अर्धशतक
अभिषेकने अवघ्या १६ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंमध्ये अर्धशतक करण्याची त्याची ही सहावी वेळ आहे. या बाबतीत तो जागतिक क्रिकेटमध्ये आघाडीवर आहे.
भारताकडून सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम युवराज सिंहच्या नावावर आहे. त्याने २००७ मध्ये इंग्लंडविरुद्ध १२ चेंडूंमध्ये अर्धशतक केले होते.
८. एका डावात ११ षटकार
अभिषेकने दिल्लीतील खेळीत तब्बल ११ षटकार ठोकले. भारताकडून टी-२०च्या एका डावात सर्वाधिक षटकारांचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. २०२५ मध्ये इंग्लंडविरुद्ध त्याने एका डावात १३ षटकार मारले होते. त्यामुळे दिल्लीतील ११ षटकारांची खेळी या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
९. यंदा ९६ षटकार
२०२६ या वर्षात अभिषेकने आतापर्यंत सर्व टी-२० सामन्यांमध्ये मिळून ९६ षटकार लगावले आहेत. एका कॅलेंडर वर्षात भारतीय फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक षटकारांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.
विशेष म्हणजे या यादीतील पहिल्या क्रमांकावरही अभिषेकच आहे. त्याने २०२५ मध्ये तब्बल १०८ षटकार ठोकले होते.
अफगाणिस्तानविरुद्धच्या या सामन्यातील १०८ धावांच्या खेळीमुळे अभिषेकने वैयक्तिक विक्रमांसोबतच भारतीय टी-२० क्रिकेटच्या विक्रमांच्या यादीतही आपले नाव ठळकपणे नोंदवले आहे.