Skip to content
Menu

१७ हजार फूट उंचीवर इंडिगो विमानाला विजेचा तडाखा; लखनौमध्ये इमर्जन्सी लँडिंग

October 8, 2026
देश-विदेश

वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे १०४ प्रवासी सुरक्षित; विमानाच्या पुढील भागाचे नुकसान

लखनौ : पाटण्याहून लखनौकडे निघालेल्या इंडिगोच्या विमानाला प्रवासादरम्यान विजेचा जोरदार तडाखा बसल्याची घटना घडली. सुमारे १७ हजार फूट उंचीवर खराब हवामानातून विमान जात असताना ही घटना घडली. विजेच्या तडाख्यामुळे विमानाच्या पुढील भागाचे म्हणजेच ‘नोज’चे नुकसान झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमानाचे लखनौ विमानतळावर सुरक्षितपणे इमर्जन्सी लँडिंग केले.

६E ९२५ क्रमांकाच्या या विमानाने पाटणा विमानतळावरून दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी उड्डाण केले होते. विमान दुपारी ४.२० वाजता लखनौला पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, मार्गात खराब हवामानाचा सामना करत असताना सुमारे १७ हजार फूट उंचीवर विमानावर वीज कोसळली.

वीज पडल्यामुळे विमानाच्या पुढील भागाचे नुकसान झाले. अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीत वैमानिकाने नियंत्रण कायम ठेवत विमान सुरक्षितपणे लखनौच्या दिशेने आणले. आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन दुपारी ४.०५ वाजता लखनौ विमानतळावर विमान उतरवण्यात आले.

१०४ प्रवासी सुखरूप

विमान लखनौ विमानतळावर उतरल्यानंतर त्यातील १०४ प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाल्याचे वृत्त नाही. विमानाचे पुढील नुकसान झाल्याने ते विमानतळावरच थांबवण्यात आले असून, तांत्रिक पथकाकडून विमानाची तपासणी सुरू आहे.

प्रवाशांसाठी पर्यायी विमानाची व्यवस्था

हेच विमान लखनौहून ६E ६९६८ या क्रमांकाने अहमदाबादकडे जाणार होते. मात्र, विजेच्या तडाख्यामुळे विमानाचे नुकसान झाल्याने इंडिगोने पुढील प्रवासासाठी प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी विमानाची व्यवस्था केली.

त्यानुसार सर्व प्रवासी सायंकाळी सुमारे ६.२२ वाजता दुसऱ्या विमानाने अहमदाबादकडे रवाना झाले. दरम्यान, विजेच्या तडाख्यामुळे नुकसान झालेल्या विमानाची तांत्रिक तपासणी सुरू असून, तपासणीनंतरच विमानाच्या नुकसानीचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.