Skip to content
Menu

प्रतिरंग स्टुडिओ आयोजित ‘सक्षम किड्स’ व्यक्तिमत्व विकास शिबिर उत्साहात संपन्न

October 7, 2026
इचलकरंजी शहर,कोल्हापूर जिल्हा,मनोरंजन,महाराष्ट्र

इचलकरंजी – येथील प्रतिरंग स्टुडिओज् एल.एल.पी. आयोजित ‘सक्षम किड्स’ (Saksham Kids) तीन दिवसीय बाल व्यक्तिमत्व विकास शिबिर नुकतेच अत्यंत उत्साही व आनंददायी वातावरणात पार पडले. २, ३ आणि ४ ऑक्टोबर रोजी आयोजित या शिबिरामध्ये लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले.

या तीन दिवसांच्या कार्यशाळेत मुलांसाठी विचारप्रवर्तक लघुपट (Films) दाखवणे, कल्पकता वाढवणारे गेम्स, ब्रेन गेम्स, वाचन कौशल्य आणि विरामचिन्हांचा योग्य वापर यांसारख्या भाषिक व बौद्धिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. सध्याच्या डिजिटल युगात मोबाईलचा अतिवापर टाळून माणसांमधील प्रत्यक्ष संवाद किती महत्त्वाचा आहे, याचे महत्त्व मुलांना विविध प्रात्यक्षिके आणि खेळांच्या माध्यमातून प्रभावीपणे पटवून देण्यात आले. मुलांनी सर्व उपक्रमांमध्ये अत्यंत उत्स्फूर्त आणि सक्रिय सहभाग नोंदवला.

शिबिराच्या शेवटच्या दिवशी ‘सक्षम पालक संवाद’ हा विशेष पालक मेळावा पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. महेश भिसे आणि डॉ. शीतल भिसे उपस्थित होत्या. त्यांनी मुलांचे मन, वर्तन समजून घेणे, मोबाईल व स्क्रीन टाइमचे व्यवस्थापन आणि मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यात पालकांची भूमिका या विषयांवर पालकांशी सविस्तर मार्गदर्शन करत मुक्त संवाद साधला.

या संपूर्ण शिबिरात शिबीर संचालक संतोष आबाळे (महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार विजेते), सारंग भांबुरे आणि प्रतीक साठे यांनी मार्गदर्शक म्हणून मुलांशी संवाद साधत अभिनय, स्टेज डेरिंग, योग-मेडिटेशन आणि जीवनकौशल्यांचे सहज-सोपे धडे दिले.

या शिबिरामुळे मुलांच्या कल्पकतेला नवी दिशा मिळाली असून, अशा उपक्रमांची आजच्या काळात मुलांसाठी नितांत गरज असल्याची भावना उपस्थित पालकांनी व्यक्त केली. प्रतिरंग स्टुडिओच्या या यशस्वी उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.