नवी दिल्ली :निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) निषेधार्थ INDIA आघाडीच्या खासदारांनी मंगळवारी दिल्लीमध्ये काढलेला मोर्चा पोलिसांनी अडविला. संसद भवनातून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाच्या दिशेने निघालेल्या खासदारांना पुढे जाण्याची परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक खासदारांनी संसद मार्गावरच ठिय्या आंदोलन सुरू केले.
विरोधकांकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर SIR प्रक्रिया मागे घेण्याची मागणीही करण्यात आली आहे. मतदार यादीच्या पुनरीक्षणादरम्यान मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला आहे.
मकर द्वारातून मोर्चाला सुरुवात
राहुल गांधी यांच्यासह INDIA आघाडीतील अनेक खासदार संसद भवनाच्या मकर द्वारातून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या दिशेने निघाले. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संसद परिसर तसेच निवडणूक आयोगाच्या कार्यालयाभोवती मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मोर्चाच्या मार्गावर ठिकठिकाणी बॅरिकेड उभारण्यात आले होते. मोठ्या संख्येने पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले होते.
मोर्चा रोखल्यानंतर ठिय्या
पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना पुढे जाण्यापासून रोखल्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसद मार्गावरच आंदोलन सुरू केले. राहुल गांधी यांच्यासह अन्य खासदारांनी निवडणूक आयोगाविरोधात घोषणाबाजी केली.
दरम्यान, पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेडमुळे मोर्चा अडविण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. राहुल गांधी बॅरिकेडजवळ पोहोचल्याचेही समोर आले.
विरोधकांनी SIR प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत मतदार यादीतील कथित अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाकडून मात्र SIR प्रक्रिया ही मतदार यादी अधिक अचूक करण्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया असल्याचे सांगितले जात आहे.