Skip to content
Menu

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपचे तीन उमेदवार जाहीर

October 4, 2026
महाराष्ट्र

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून भारतीय जनता पक्षाने तीन मतदारसंघांसाठी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव, नागपूर पदवीधर मतदारसंघातून माजी आमदार सुधाकर कोहळे, तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

यापूर्वी काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यानंतर आता भाजपनेही आपली भूमिका स्पष्ट केल्याने विधानपरिषद निवडणुकीतील राजकीय चित्र अधिक स्पष्ट झाले आहे.

नागपूरमधून सुधाकर कोहळेंना संधी

नागपूर पदवीधर मतदारसंघातून भाजपने माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. कोहळे हे शिक्षक असून त्यांनी नागपूर महानगरपालिकेत भाजपच्या चिन्हावर दोन वेळा नगरसेवक म्हणून काम केले आहे. महापालिकेत त्यांनी पाणीपुरवठा सभापतीपदाची जबाबदारीही सांभाळली आहे.

2014 मध्ये पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतीश चतुर्वेदी यांचा पराभव करून विधानसभेत प्रवेश केला होता. 2019 मध्ये त्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतरही त्यांनी पक्षाशी निष्ठा कायम ठेवली.

2024 मध्ये भाजपने त्यांना पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र, त्या निवडणुकीत काँग्रेसचे विकास ठाकरे यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर पक्षाने त्यांच्याकडे नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीची जबाबदारी सोपवली होती.

आता भाजपने त्यांनाच उमेदवारी दिल्याने नागपूर पदवीधर मतदारसंघात त्यांची काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांच्याशी थेट लढत होणार आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता जाधव

पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपने डॉ. स्मिता योगेश जाधव यांना मैदानात उतरवले आहे. डॉ. जाधव यांनी शिक्षण क्षेत्रासह माध्यम, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रात काम केले आहे. त्यांच्याकडे पीएच.डी. (एज्युकेशन), एमबीए (फायनान्शियल मॅनेजमेंट) आणि बीई (कॉम्प्युटर्स) या पदव्या आहेत.

त्या पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू असून डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीच्या सचिव म्हणूनही कार्यरत आहेत. तसेच पुढारी पब्लिकेशनच्या संचालक, टोमॅटो 94.3 एफएम आणि आपलं एफएम 91.9च्या कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

कस्तुरी क्लबच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी महिलांसाठी मोठे नेटवर्क उभारले असून सामाजिक सहभाग, नेतृत्व आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. त्यांच्या कार्याची विविध पुरस्कारांनी दखल घेण्यात आली आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली आहे. गावडे यांनी एम.कॉम. आणि एमबीएपर्यंत शिक्षण घेतले असून ते श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

शिक्षक, प्राध्यापक, शिक्षणतज्ज्ञ, संस्थाचालक तसेच शैक्षणिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात राहून त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम केले आहे.

23 ऑक्टोबरला मतदान

महाराष्ट्रातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 29 सप्टेंबरला अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून 6 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

7 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल, तर 9 ऑक्टोबर ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. 23 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार असून 27 ऑक्टोबरला मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.

भाजपने तीन उमेदवारांची नावे जाहीर केल्याने आता पुणे आणि नागपूरसह संबंधित मतदारसंघांतील निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.