हिंगोली/नांदेड : मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत शनिवारी सकाळी पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील गढाळा परिसरात सकाळी सुमारे ७.४६ वाजता भूगर्भातून आवाजासह सौम्य धक्का जाणवला. हिंगोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माहितीनुसार या धक्क्याची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल इतकी नोंदली गेली. प्राथमिक माहितीनुसार या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.
भूकंपाचा धक्का जाणवताच काही भागांत नागरिक घराबाहेर पडले. भूगर्भातून आलेल्या आवाजामुळेही नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. गेल्या काही दिवसांत परिसरात जाणवत असलेल्या भूगर्भीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पुन्हा धक्का बसल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
नांदेडमध्येही जाणवली कंपने
हिंगोलीतील भूकंपीय हालचालींचा परिणाम लगतच्या नांदेड जिल्ह्यातील काही भागांतही जाणवल्याचे वृत्त आहे. जमीन हादरल्याचे जाणवताच नागरिकांनी खबरदारी म्हणून घराबाहेर पडत मोकळ्या जागेचा आधार घेतला.
प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपामुळे नांदेड जिल्ह्यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे समोर आलेले नाही. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन
हिंगोली जिल्ह्यातील प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. भूकंपाची तीव्रता कमी असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि खबरदारीच्या उपायांचे पालन करावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, भूकंपाच्या धक्क्यांनंतर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क करण्यात आली असून, महसूल आणि पोलीस यंत्रणेला परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
‘मोठ्या भूकंपाची नांदी’ असल्याचे म्हणणे घाईचे
परिसरात वारंवार जाणवणाऱ्या सौम्य धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये मोठ्या भूकंपाबाबत चिंता व्यक्त होत असली, तरी केवळ अशा सौम्य धक्क्यांच्या आधारे भविष्यात मोठा भूकंप होणार असल्याचा निष्कर्ष काढता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवा टाळून प्रशासनाच्या अधिकृत सूचनांवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे.