मुंबई : अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) सुरू असलेल्या धडक कारवाईचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी कौतुक केले आहे. मात्र, याच कारवाईचा आधार घेत काही अधिकारी हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्विक-कॉमर्स कंपन्यांकडून पैसे उकळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी राऊत यांनी FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्राद्वारे केली आहे.
राऊत यांनी पत्रात दावा केला आहे की, FDA आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे येण्यापूर्वी ‘क्लोजिंग नोटिस’ बंद करण्यासाठी 10 ते 12 हजार रुपयांपर्यंत रक्कम घेतली जात असल्याचे सांगितले जात होते. आता हेच कथित ‘रेट कार्ड’ 75 हजार ते 2 लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याचा आरोप त्यांनी केला आहे. व्यवसायिकांना परवाना निलंबित करण्याची भीती दाखवून पैसे मागितले जात असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.
मुंढेंच्या कारवाईचे राऊतांकडून कौतुक
भेसळयुक्त दूध, बनावट किंवा निकृष्ट पनीर, अस्वच्छता आणि इतर अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात FDAकडून होत असलेल्या कारवाईचे राऊत यांनी स्वागत केले आहे. मात्र, विभागातील काही अधिकाऱ्यांकडून या कारवाईचा गैरफायदा घेतला जात असल्याचा त्यांचा दावा आहे.
विशेषतः FDAमधील काही सहाय्यक आयुक्त, नियुक्त अधिकारी आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून हॉटेल, रेस्टॉरंट तसेच क्विक-कॉमर्स कंपन्यांवर परवाना निलंबनाची कारवाई करण्याची भीती दाखवली जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.
ठाण्यातील कंपनीकडून 17-18 लाख रुपये घेतल्याचा दावा
राऊत यांनी पत्रात ठाण्यातील एका क्विक-कॉमर्स कंपनीचा संदर्भ देत परवाना पुन्हा बहाल करण्यासाठी 17 ते 18 लाख रुपये घेतल्याचा आरोप केला आहे. तसेच मुंबईतील वांद्रे येथील FDA मुख्यालय आणि ठाणे कार्यालयातील काही ठिकाणी कथित वसुली होत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
तक्रारींची पडताळणी आणि चौकशीची मागणी
FDAच्या कारवायांमागे ग्राहकांच्या तक्रारींचा आधार घेतला जात असल्यास त्या तक्रारी खऱ्या आहेत की बनावट, याची पडताळणी करावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे. तसेच परवाना निलंबित करण्यापूर्वी कायद्यानुसार नोटीस, सुनावणी आणि त्यानंतरची प्रक्रिया पाळली जाते की नाही, याची तपासणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
क्लोजिंग नोटिसच्या कथित ‘रेट कार्ड’ची स्वतंत्र चौकशी, ठाण्यातील 17-18 लाखांच्या आरोपाची तपासणी आणि परवाना निलंबन व पुनर्बहालीची कारणे व सुनावणीचा तपशील सार्वजनिक करण्याची मागणीही राऊत यांनी केली आहे.
तुकाराम मुंढेंचे काय म्हणणे?
दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी राऊत यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना ठोस माहिती किंवा पुरावे उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे. राऊत यांचे पत्र आपल्याला मिळाले नसल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आरोपांबाबत संबंधितांकडे माहिती असल्यास ती आपल्याकडे किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे द्यावी, असे मुंढे यांनी म्हटले आहे.
त्यामुळे FDAच्या धडक कारवाईसोबतच आता विभागातील कथित गैरप्रकारांच्या आरोपांवरूनही प्रशासन आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.