Skip to content
Menu

लक्ष्मण हाकेंसह ७ सहकाऱ्यांवर यवत पोलिसांत गुन्हा; परवानगी नसताना मोर्चा काढल्याचे प्रकरण

September 28, 2026
महाराष्ट्र

पुणे : ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांच्यासह त्यांच्या सात सहकाऱ्यांविरोधात दौंड तालुक्यातील यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची परवानगी नसतानाही ओबीसी महामोर्चा काढल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली १ सप्टेंबर रोजी पाटस येथून मुंबईच्या दिशेने मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही मोर्चा काढण्यात आल्याने पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली.

या प्रकरणात लक्ष्मण हाके यांच्यासह बापूराव सोनवलकर, किशोर महाराज हिंगणे, नानासाहेब मदने, अतुल टेळे, रामचंद्र भागवत आणि शंकर पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. संबंधितांना २९ सप्टेंबर रोजी पोलिस ठाण्यात हजर राहण्याची नोटीसही बजावण्यात आली आहे.

मोर्चाच्या आधीच पोलिसांची नोटीस

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांनी लक्ष्मण हाके यांना यापूर्वीच नोटीस बजावली होती. मोर्चाचा मार्ग, सहभागी होणाऱ्या वाहनांची संख्या तसेच संभाव्य आंदोलकांची संख्या याबाबत माहिती देण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या होत्या. कायदा-सुव्यवस्था आणि वाहतुकीच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी ही माहिती मागवण्यात आली होती.

त्यानंतर पाटस टोलनाक्यावरून मोर्चाला सुरुवात झाली आणि आंदोलक यवत येथे दाखल झाले. यवत येथे आंदोलनादरम्यान शासन निर्णयाची होळी करण्यात आल्याचेही वृत्त आहे.

मोर्चा नंतर स्थगित

मुंबईच्या दिशेने सुरू असलेला ओबीसी एल्गार मोर्चा २ सप्टेंबर रोजी तात्पुरता स्थगित करण्यात आला होता. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ओबीसी शिष्टमंडळासोबत बैठक घेण्याच्या आश्वासनानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी ओबीसींच्या हक्कांसाठी स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याची भूमिका मांडली आहे. तसेच मनोज जरांगे यांच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली आहे. आगामी काळात ओबीसींच्या प्रश्नांवर संघटितपणे लढा देण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे.