नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून सायबर हल्ले करणाऱ्या ‘EvilTokens’ या प्लॅटफॉर्मविरोधात मायक्रोसॉफ्टने कारवाई केली आहे. या सबस्क्रिप्शन आधारित प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जगभरातील सुमारे १२ हजार मायक्रोसॉफ्ट अकाउंटमध्ये घुसखोरी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणानंतर संबंधित AI पायाभूत सुविधांवर कारवाई करत अनेक वेबसाइट आणि डोमेन बंद करण्यात आल्याचे मायक्रोसॉफ्टने सांगितले.
‘EvilTokens’ प्लॅटफॉर्म पहिल्यांदा फेब्रुवारीमध्ये टेलिग्रामवर आल्याचे सांगण्यात आले. सुरुवातीला या सेवेसाठी १,५०० डॉलर शुल्क आकारले जात होते. त्यानंतर मासिक ५०० डॉलर शुल्क आकारून ई-मेल अकाउंटमध्ये घुसखोरी करण्याच्या सेवा पुरवल्या जात होत्या.
ई-मेलमध्ये घुसल्यानंतर आर्थिक फसवणुकीचा प्रयत्न
मायक्रोसॉफ्टच्या माहितीनुसार, एखाद्या व्यक्तीच्या ई-मेल अकाउंटमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर हल्लेखोर इनबॉक्समधील माहितीचा वापर करून संबंधित संस्थेच्या आर्थिक व्यवहारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत होते.
AI च्या मदतीने केवळ फसवणुकीचे संदेश तयार करण्यापुरते सायबर गुन्हे मर्यादित राहिले नाहीत. कोणाला लक्ष्य करायचे, कोणाची ओळख किंवा नक्कल करायची आणि आर्थिक फायदा मिळवण्यासाठी कोणत्या संबंधांचा गैरवापर करता येईल, यासाठीही या तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याचे मायक्रोसॉफ्टने नमूद केले.
भारतासह अनेक देशांतील अकाउंट लक्ष्य
या सायबर हल्ल्यांमध्ये अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, भारत आणि फ्रान्स या देशांतील अकाउंटचा समावेश असल्याचे मायक्रोसॉफ्टने सांगितले. जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर व्यवहार आणि संपर्क असलेल्या संस्थांना या हल्ल्यांचे लक्ष्य करण्यात आल्याचेही समोर आले आहे.
विशेषतः आर्थिक सेवा, रिअल इस्टेट, उच्च शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील संस्था या हल्लेखोरांच्या निशाण्यावर असल्याचे सांगण्यात आले.
५० वेबसाइट सीज; १५० हून अधिक डोमेन बंद
या प्रकरणात मायक्रोसॉफ्टने भागीदार संस्थांच्या मदतीने सुमारे ५० वेबसाइट सीज केल्या आहेत. तसेच EvilTokens च्या AI पायाभूत सुविधांना मदत करणारे १५० हून अधिक अतिरिक्त डोमेन डिसेबल करण्यात आले आहेत.
दरम्यान, ब्रिटनमध्ये काही संशयितांना सायबर गुन्ह्यांच्या आरोपावरून ताब्यात घेण्यात आले आहे. हे संशयित EvilTokens च्या कारवायांशी संबंधित असल्याचा आरोप आहे. या संपूर्ण कारवाईनंतर AI च्या गैरवापरातून होणाऱ्या सायबर हल्ल्यांचा धोका पुन्हा अधोरेखित झाला आहे.