Skip to content
Menu

विकासकामांचा निधी दुष्काळ निवारणासाठी वळवा : उद्धव ठाकरे

September 24, 2026
महाराष्ट्र

मुंबई : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. सुरू असलेल्या विविध योजना आणि विकास प्रकल्पांसाठीच्या निधीला सध्या प्राधान्य न देता तो निधी दुष्काळ निवारणासाठी वळवावा, अशी भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

ठाकरे म्हणाले, राज्यात सध्या गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून पुढील पावसापर्यंत शेतकऱ्यांना त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे सरकारने प्राधान्यक्रम बदलून शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची गरज आहे. विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या काही प्रकल्पांच्या खर्चाऐवजी हा निधी दुष्काळ निवारणासाठी वापरावा, अशी मागणी त्यांनी केली.

बुलेट ट्रेनसह काही विकास प्रकल्पांचा उल्लेख करत ठाकरे यांनी त्यावरही प्रश्न उपस्थित केले. तसेच लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीबाबतही त्यांनी आरोप केले. इतरत्र वळवला जाणारा निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वापरण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

दुष्काळी भागाची पाहणी करणार

दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. प्रथम आदित्य ठाकरे दुष्काळी भागाची पाहणी करतील. त्यानंतर आपणही संबंधित भागाचा दौरा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दुष्काळी भागात शिवसैनिकांनी हेल्प सेंटर सुरू करून शेतकऱ्यांना आवश्यक मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

मागील मदतीचा हिशेब द्या

यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या ३१ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजमधून प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत किती मदत पोहोचली, याची माहिती सरकारने द्यावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली. जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांसाठी हेक्टरी साडेतीन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती, त्याचा प्रत्यक्ष लाभ किती जणांना मिळाला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

यंदाच्या हंगामात अनेक शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागल्याचा दावा करत त्यांनी परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले. दुष्काळाची शक्यता आधीच व्यक्त करण्यात आली होती, मग त्यानुसार सरकारने पूर्वतयारी केली होती का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

पंचनाम्यांसाठी प्रतीक्षा कशाला?

५ ऑक्टोबरनंतर पंचनामे सुरू करण्याच्या निर्णयावरही ठाकरे यांनी टीका केली. शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर असताना मदतीसाठी नियम आणि प्रक्रियेची वाट पाहण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले.

सरकारने दोन-तीन दिवसांत मदतीबाबत निर्णय घेण्याचे सांगितले आहे. मात्र, शेतकऱ्यांना तातडीने मदत आवश्यक असताना पुन्हा दोन-तीन दिवसांची प्रतीक्षा कशासाठी, असा सवाल त्यांनी केला. दुष्काळी पाहणी दौऱ्यांच्या उद्देशावरही त्यांनी प्रश्न उपस्थित करत सरकारवर टीका केली.