Skip to content
Menu

वांगचुक यांच्या पदयात्रेला सीजेपीच्या प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती

September 24, 2026
देश-विदेश

लेह : लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह सहाव्या अनुसूचीअंतर्गत घटनात्मक संरक्षण देण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी पुन्हा आंदोलनाची भूमिका घेतली आहे. २४ सप्टेंबर २०२५ रोजी लडाखमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी बुधवारी लेहमध्ये प्रतीकात्मक पदयात्रा काढली. मात्र, या पदयात्रेत कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी)च्या प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती दिसून आली.

वांगचुक यांनी यापूर्वी १९ ते २४ सप्टेंबरदरम्यान पदयात्रा काढण्याची घोषणा केली होती. यासाठी त्यांनी व्हिडीओ प्रसिद्ध करून सहभागाचे आवाहनही केले होते. त्यांच्या आवाहनानंतर अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी लडाखच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला होता. मात्र, यापैकी एकही प्रमुख नेता पदयात्रेत सहभागी झाला नाही.

दरम्यान, खराब हवामानामुळे वांगचुक यांनी चार दिवसांची प्रस्तावित यात्रा स्थगित केली. त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी एक दिवसाची प्रतीकात्मक पदयात्रा काढण्याची घोषणा करण्यात आली. बुधवारी वांगचुक काही नागरिकांसह लेहच्या दिशेने निघाले. या पदयात्रेत लडाखसह इतर प्रदेशांतून आलेले काही नागरिकही सहभागी झाले होते.

मात्र, सीजेपीचे अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्यापैकी कोणीही या पदयात्रेत उपस्थित नव्हते. वांगचुक यांच्या आवाहनाला या नेत्यांनी पाठिंबा दर्शविला असला, तरी प्रत्यक्ष पदयात्रेत सहभागी होण्याबाबत त्यांनी कोणतीही घोषणा केली नव्हती किंवा नकारही दिला नव्हता.

लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीअंतर्गत घटनात्मक संरक्षण या मागण्यांसाठी यापूर्वी झालेल्या आंदोलनादरम्यान २४ सप्टेंबर २०२५ रोजी केंद्रशासित प्रदेशात हिंसाचार झाला होता. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या स्मृतिदिनानिमित्त वांगचुक यांनी पुन्हा लडाखच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.