नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी करण्यासाठी राजनैतिक पातळीवर प्रयत्न सुरू असतानाच होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत इराणने महत्त्वाची भूमिका मांडली आहे. अमेरिकेने लष्करी दबाव कमी करून इराणी बंदरांवरील नाकेबंदी हटवल्यास सात दिवसांच्या आत होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली केली जाऊ शकते, असे एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने सांगितल्याचे वृत्त आहे.
न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमध्ये संवादाचे प्रयत्न सुरू आहेत. या चर्चेत होर्मुझची सामुद्रधुनी हा महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. इराणने मध्यस्थांमार्फत आपली भूमिका अमेरिकेपर्यंत पोहोचवल्याचे सांगितले जात आहे.
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकी प्रतिनिधी स्टीव्ह विटकॉफ यांच्यासोबत झालेल्या चर्चेत काही अटी मांडल्याचे वृत्त आहे. अमेरिकेने नौदलाची नाकेबंदी हटवणे, गोठवलेली इराणी मालमत्ता परत करणे आणि विविध आघाड्यांवरील शत्रुत्व थांबवणे या मागण्यांचा त्यात समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रश्नावर आखाती देशांकडूनही राजनैतिक प्रयत्न सुरू आहेत. कतारने इराण आणि अमेरिकेदरम्यान संवादाचा मार्ग खुला करण्यासाठी पाकिस्तानसोबत काम करत असल्याचे म्हटले आहे. सौदी अरेबिया, इजिप्त, पाकिस्तान आणि तुर्की यांनीही संवादातून तोडगा काढण्याला पाठिंबा दर्शवला आहे.
अराघची यांनी न्यूयॉर्कमध्ये कतारचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांची भेट घेतली. त्याचवेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आखाती देशांच्या नेत्यांसोबत चर्चा केली. अमेरिका सर्व संबंधित पक्षांचे म्हणणे ऐकत असून इराणसोबत कराराच्या दिशेने चर्चा पुढे जाऊ शकते, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
मात्र, राजनैतिक चर्चेसोबतच दोन्ही बाजूंकडून कठोर भूमिका कायम आहे. इराणी संसदेचे उपसभापती अली निकझाद यांनी होर्मुझचा मुद्दा चर्चेत महत्त्वाचा असून या भूमिकेतून इराण माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
त्यामुळे आगामी काळात अमेरिका-इराण चर्चेत होर्मुझची सामुद्रधुनी हा निर्णायक मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. मात्र, सामुद्रधुनी सात दिवसांत खुली करण्याबाबतचा इराणचा दावा हा त्याने मांडलेल्या अटींच्या पूर्ततेशी जोडलेला आहे.