मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर राज्यातील काही भागांत पुन्हा पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाने २३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील विविध भागांसाठी पावसासह मेघगर्जना आणि विजांचा इशारा दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत पावसाची शक्यता आहे.
राज्यातील काही भागांत बुधवारी जोरदार पावसाची शक्यता असून, ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भात पावसासोबत विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी जोरदार वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
लातूर, धाराशिव, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली आणि गोंदिया या भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याचे देण्यात आलेल्या माहितीत नमूद आहे. तसेच कोल्हापूर, सांगली, पुणे, नाशिक, सातारा, सोलापूर आणि अहिल्यानगर परिसरातही मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरातील हवामानातील बदलामुळे राज्यात पावसाची स्थिती सक्रिय झाली आहे. विदर्भात २४ आणि २५ सप्टेंबर रोजी काही भागांत अतिजोरदार पावसाची शक्यता असून, मराठवाड्यातही पुढील काही दिवस पावसाचा अंदाज कायम आहे.
पावसाचे प्रमाण काही भागांत वाढले असले तरी राज्यातील अनेक ठिकाणी पाणीटंचाई आणि शेतीवरील संकट कायम आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात पावसाअभावी पाझर तलाव कोरडे पडल्याने काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे आगामी पाऊस शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.