Skip to content
Menu

महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

September 18, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या

मुंबई : राज्यातील अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांवर परिणाम झाला असून शेतकरी, शेतमजूर आणि पशुधनासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पवार यांनी पत्रातून नऊ प्रमुख मागण्या मांडल्या आहेत.

तत्काळ दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता औपचारिक निकषांची प्रतीक्षा न करता राज्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी पवार यांनी केली आहे. गंभीर परिस्थिती असलेल्या तालुक्यांना दुष्काळसदृश परिस्थितीग्रस्त घोषित करून संबंधित सवलती लागू कराव्यात, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेक्टरी ५० हजार, मजुरांना २५ हजारांची मदत

दुष्काळी परिस्थितीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजार रुपये मदत द्यावी. तसेच शेतमजूर कुटुंबांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची विशेष मदत देण्याची मागणी पवार यांनी केली आहे.

कर्जमाफी आणि पीककर्जाची मागणी

आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना तातडीने लागू करावी आणि त्यांना पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिले जाणारे प्रोत्साहनपर अनुदान ५० हजारांवरून १ लाख रुपये करावे. तसेच २०२५-२६ मध्ये पीककर्ज घेऊन यंदा थकीत झालेल्या शेतकऱ्यांचाही कर्जमाफी योजनेत समावेश करावा, असे पवार यांनी म्हटले आहे.

एक रुपयात पीकविमा आणि नुकसानभरपाई

एक रुपयातील पीकविमा योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी. यापूर्वी वगळण्यात आलेले ट्रिगर पुन्हा लागू करून शेतकऱ्यांना पीकविम्याचे संरक्षण द्यावे, अशी मागणी आहे.

गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी जाहीर केलेली हेक्टरी १७ हजार रुपयांची पीकविमा मदतही तातडीने वितरित करावी, असे पवार यांनी पत्रात नमूद केले आहे.

रोजगार हमी, टँकर आणि चारा छावण्यांवर भर

दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये रोजगार हमी योजनेतून शेती व जलसंधारणाची कामे सुरू करावीत. फळबागा वाचवण्यासाठी टँकरची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

पाणीटंचाई असलेल्या गावांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यकतेनुसार शासकीय टँकर सुरू करावेत. पशुधनासाठी चारा छावण्या, पिण्याचे पाणी आणि पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असेही पत्रात म्हटले आहे.

वीजपुरवठा आणि नियंत्रण कक्षाची मागणी

दुष्काळी परिस्थितीत वीजपुरवठ्याच्या समस्या वाढू नयेत यासाठी विद्युत रोहित्रांच्या दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे.

तसेच प्रत्येक जिल्ह्यातील पर्जन्यमान, पिकांची स्थिती, पाणीटंचाई, चारा उपलब्धता आणि पशुधनाची स्थिती यावर नियमित लक्ष ठेवण्यासाठी राज्य आणि जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करावेत, असेही त्यांनी सुचवले आहे.

विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी

दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या तालुक्यांतील शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये केवळ परीक्षा शुल्क माफ न करता विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणीही पवार यांनी केली आहे.

शेतकरी, शेतमजूर, पशुधन आणि ग्रामीण भागातील जनजीवनावर निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून सरकारने या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शरद पवार यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.

दरम्यान, राज्यातील अनेक भागांत पावसाचा खंड पडल्याने दुष्काळसदृश परिस्थितीचा सरकारकडून आढावा घेतला जात असून, काही भागांत पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.