Skip to content
Menu

संतोष पंडित यांची जामिनावर सुटका; म्हणाले, ‘न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास’

September 18, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या

पुणे : सोशल मीडियावरील व्हिडीओ प्रकरणात अटक करण्यात आलेले यू-ट्युबर संतोष पंडित यांची येरवडा कारागृहातून जामिनावर सुटका झाली. १६ सप्टेंबर रोजी न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर १७ सप्टेंबर रोजी त्यांची कारागृहातून सुटका करण्यात आली.

जामीन मंजूर करताना न्यायालयाने काही अटीही घातल्या आहेत. पंडित यांनी फिर्यादीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही प्रकारे संपर्क साधू नये, तसेच प्रकरणातील पुराव्यांमध्ये छेडछाड करू नये, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

कारागृहातून बाहेर आल्यानंतर संतोष पंडित यांनी आपल्या भूमिकेबाबत प्रतिक्रिया दिली. “जे काही झालं, तो मोठा धक्का होता. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे आणि माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. मी जे काही करतोय, तो माझा संवैधानिक अधिकार आहे. हा अधिकार मी यापुढेही बजावत राहणार,” असे त्यांनी सांगितले.

‘मी थांबणार नाही’

आपण लोकशाही व्यवस्थेत प्रश्न विचारत राहणार असल्याचेही पंडित यांनी स्पष्ट केले. “मी थांबणार नाही. लोकशाहीत जनता देशाची मालक आहे. जनतेने प्रश्न विचारले पाहिजेत. मी कोणावरही वैयक्तिक टीका केलेली नाही. आपण ज्यांना निवडून देतो आणि जे सत्तेत आहेत, त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत,” असे पंडित म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

संतोष पंडित हे पुणे महापालिकेच्या विकासकामांबाबत तसेच त्यातील त्रुटींवर भाष्य करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह आणि शिवराळ भाषेचा वापर असलेली व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी मंत्र्यांची जाहीर बदनामी केल्याच्या आरोपावरून डेक्कन पोलिसांनी दोन संशयितांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला होता. भाजपचे स्थानिक माजी नगरसेवक सुनील पांडे यांनी संतोष पंडित यांच्याविरोधात तक्रार दिली होती.

लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात, असा आशय संबंधित व्हिडीओमध्ये मांडण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, टीकेसोबत शिवीगाळ आणि असभ्य भाषेचा वापर केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.