Skip to content
Menu

राजकीय स्वार्थासाठी आंदोलनाचा वापर होऊ नये; जरांगेंच्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया

September 15, 2026
महाराष्ट्र

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची भूमिका घेतली असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. आरक्षण देताना ओबीसींसह कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, ही सरकारची भूमिका कायम असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारची भूमिका मांडली. ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी किंवा अन्य कोणत्याही समाजावर अन्याय होऊ नये, याची सरकारने सुरुवातीपासूनच भूमिका घेतली आहे. मराठा समाजाकडून मांडण्यात आलेले मुद्दे सोडविण्याचा सरकारने प्रयत्न केला आहे. काही प्रकरणे सध्या न्यायप्रविष्ट असून, सरकार या विषयावर सकारात्मक आहे. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि कोणत्याही समाजावर अन्याय होता कामा नये, असेही त्यांनी सांगितले.

मनोज जरांगे पाटील मुंबईत उपोषणासाठी निघाल्याबाबत विचारले असता शिंदे म्हणाले की, सध्या गणेशोत्सवाचा काळ आहे. या उत्सवात कोणतेही विघ्न निर्माण होऊ नये, ही सरकारची भूमिका आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनीही समजूतदारपणाची भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

मराठा समाजाच्या यापूर्वी अनेक मागण्या आणि मोर्चे झाले आहेत. मात्र, त्यावेळी कोणत्याही समाजाला त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात आली, असेही शिंदे यांनी नमूद केले.

जरांगे यांच्या वक्तव्यांबाबत प्रश्न विचारण्यात आला असता, आंदोलन करणे किंवा सरकारवर टीका करणे हा प्रत्येकाचा अधिकार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. मात्र, समाजाच्या प्रश्नांसाठी भूमिका घेताना त्याला राजकीय रंग दिला जाऊ नये, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

समाजहिताची भूमिका महत्त्वाची असून, समाजाच्या प्रश्नांचा वापर राजकीय हितासाठी होऊ नये. कोणीही या आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय पोळी भाजून घेऊ नये, असा संदेश शिंदे यांनी दिला.