Skip to content
Menu

रात्री २ वाजता जरांगेंची सभा; ‘माझ्या मागे येऊ नका, नाहीतर…’

September 16, 2026
महाराष्ट्र

पाटोदा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे पाटील बुधवारी पहाटेच्या सुमारास बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे पोहोचले. रात्री उशीर झालेला असतानाही त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी हजारो मराठा समाजबांधव आणि महिला पाटोद्यात जमल्या होत्या.

पाटोद्यात पोहोचल्यानंतर जरांगे पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी आपल्या प्रकृतीची स्थिती सांगत शरीर साथ देत नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, प्रकृतीपेक्षा मराठा आरक्षणाचा लढा महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

“तुमच्यासमोर खणखणीत बोलत असतो; पण आता बोलताही येत नाही. समाज माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. आपल्या समाजाला मोठं करायचं आहे. सगळ्यांनी लढायला शिकलं पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.

आपल्या उपोषणाला १८ दिवस पूर्ण झाल्याचे सांगताना जरांगे पाटील म्हणाले की, सलाईन घेतल्यानंतर काही काळ प्रकृतीत सुधारणा जाणवली होती. मात्र, १२ सप्टेंबरला सलाईन बंद केल्यानंतर पुन्हा त्रास सुरू झाला. “आज मला हात-पाय हलवता येत नाहीत. समाजाच्या लेकरांसाठी लढताना शरीर थकलं आहे,” असे त्यांनी सांगितले.

उपस्थितांकडून त्यांना सलाईन घेण्याची विनंती करण्यात आली. त्यावर, “तुमच्यासाठी मी सरकारला अंगावर घेतलं आहे. शरीरापेक्षा आरक्षणाचा लढा महत्त्वाचा आहे. मात्र, उपोषणाच्या काळात दौरा करणे आता मला शक्य होत नाही,” असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

‘माझ्या मागे मोठ्या संख्येने वाहने आणू नका’

पाटोद्यातील सभेत जरांगे पाटील यांनी समर्थकांना आपल्या पुढील प्रवासादरम्यान मोठ्या संख्येने वाहने घेऊन मागे येऊ नये, असे आवाहन केले.

“उद्या पाटोद्यातून एकही गाडी माझ्या मागे येऊ देऊ नका. तुम्ही माझ्या मागे येणार असाल तर मी पुन्हा अंतरवाली सराटीत जाईन. नाहीतर पाटोद्यातच उपोषण सुरू करीन,” असा इशारा त्यांनी दिला.

प्रकृतीमुळे पुढील दौरा करता येईल की नाही, याबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली. “मला आता पुढचा दौरा शक्य होत नाही. पाटोद्यातून पोलिसांना सांगून मी थेट मुंबईला जाईन,” असे त्यांनी सांगितले.

‘आरक्षण महत्त्वाचे, दौरा नाही’

आपल्या प्रकृतीपेक्षा आरक्षणाचा प्रश्न अधिक महत्त्वाचा असल्याचे सांगताना जरांगे पाटील म्हणाले, “आरक्षण महत्त्वाचं आहे, दौरा महत्त्वाचा नाही. माझ्याकडून आता पुढचा दौरा शक्य होत नाही.”

प्रकृतीत सुधारणा झाली तर पुढील दौऱ्यात सहभागी होऊ; मात्र त्रास कायम राहिल्यास प्रवास करणे शक्य होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘५८ लाख नोंदी मिळाल्याचा दावा’

मराठा आरक्षणाच्या मागणीवर बोलताना जरांगे पाटील यांनी ५८ लाख नोंदी मिळाल्याचा दावा केला. या नोंदींच्या आधारे मोठ्या संख्येने समाज आरक्षणाच्या प्रक्रियेत गेल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, आता गॅझेटसाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

“पेनड्राइव्हमध्ये सगळ्या नोंदी घेतल्या आहेत. सरकारने काहीही केलं तरी नोंदी आपल्या हातात आहेत. आपल्या हातात आता चेक आहे. तो आपण कधीही बँकेत टाकू शकतो. मराठे आता विजयाच्या उंबरठ्यावर आहेत,” असे ते म्हणाले.

फडणवीसांवर आरोप

सभेदरम्यान जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आरोप केले. फडणवीस यांच्यासोबत राजकीय संघर्ष सुरू असल्याचे सांगत “देवेंद्र फडणवीस यांना तोडीस तोड डाव टाकतोय,” असे त्यांनी म्हटले. तसेच, आपल्याविरोधात गोळीबाराच्या कटाचा आरोपही त्यांनी केला.

‘नेत्यावर किंवा पक्षावर प्रेम करू नका’

मराठा समाजाला संबोधित करताना जरांगे पाटील यांनी नेते किंवा राजकीय पक्षापेक्षा आरक्षणाच्या मागणीला प्राधान्य देण्याचे आवाहन केले.

“तुम्ही नेत्यावर आणि पक्षावर प्रेम करू नका. आरक्षण मिळाल्यावर करा,” असे ते म्हणाले.

“मी माझ्या कुटुंबाला सांगून आलोय, स्वाभिमानाने जगा. पोराला सांगितलंय, धाडसाने पुढे चला. मी समाजासाठी गेलो तर पुढे गाडा चालवा,” असेही त्यांनी उपस्थितांना सांगितले.