Skip to content
Menu

MPSC सचिवांच्या तोंडाला काळं फासल्याने खळबळ; संभाजी ब्रिगेडचा आक्रमक इशारा

September 11, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या

नवी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काळं फासल्याची घटना नवी मुंबईत घडली. MPSC औषध निरीक्षक पदाच्या कथित पेपरफुटीच्या प्रकरणावरून संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेत ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले.

या घटनेनंतर संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रवक्ते संतोष शिंदे यांनी सरकार आणि MPSC प्रशासनावर जोरदार टीका केली. राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच MPSCचे अध्यक्ष आणि सचिव यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

औषध निरीक्षक पदाच्या कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडने 3 ऑगस्ट रोजी राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलन केले होते. त्यावेळी सरकारला इशारा देण्यात आला होता. मात्र, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने आता अधिक आक्रमक पद्धतीने आंदोलन करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.

‘आजची कारवाई केवळ झलक, अध्यक्षांचा नंबर बाकी’

MPSCच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संतोष शिंदे यांनी आयोगाच्या अध्यक्षांनाही इशारा दिला. तरुणांच्या भवितव्याशी संबंधित परीक्षा वारंवार वादात येत असतील, प्रश्नपत्रिका फुटत असतील आणि परीक्षा रद्द करण्याची वेळ येत असेल, तर याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.

MPSCच्या अध्यक्ष आणि सचिवांसह संबंधित यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. आजची कारवाई ही केवळ सुरुवात असून, अध्यक्षांविरोधातील आंदोलनही तीव्र केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

सुप्रिया सुळे यांनी केली कारवाईची निंदा

दरम्यान, या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली. आंदोलन करणे आणि सरकारसोबत चर्चा करून प्रश्न सोडवणे हा लोकशाही मार्ग आहे; मात्र कोणाच्या तोंडावर काळं फासणे किंवा शाईफेक करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

MPSCच्या प्रश्नावर विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, हीच भूमिका असल्याचे सांगत त्यांनी संविधानाच्या चौकटीत राहून प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री आणि विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या चर्चेतून काही मुद्दे पुढे आले असून, त्यावर चर्चा करून मार्ग काढता येऊ शकतो, असेही सुळे यांनी सांगितले.

कोण आहेत महेंद्र हरपाळकर?

महेंद्र हरपाळकर हे डिसेंबर 2025 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवपदावर कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीवर काम केले आहे. प्रशासनात ते 1995 पासून कार्यरत असल्याची माहिती आहे.

औषध निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेतील कथित पेपरफुटीबाबत तक्रार समोर आल्यानंतर हरपाळकर यांनी संबंधित प्रकरणाबाबत माहिती दिली होती.

कथित पेपरफुटीमुळे स्पर्धा परीक्षा व्यवस्थेवर प्रश्न

MPSCच्या औषध निरीक्षक, गट-ब भरती परीक्षेतील कथित पेपरफुटीमुळे राज्यातील स्पर्धा परीक्षा व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. 22 मार्च 2026 रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती.

तपासादरम्यान परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न बाहेर गेल्याचा आरोप करण्यात आला. तपास यंत्रणांच्या दाव्यानुसार, कथितरीत्या बाहेर पडलेल्या प्रश्नांपैकी 77 प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नांशी जुळल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात चौकशी, अटक आणि भरती प्रक्रियेवर झालेली कारवाई यामुळे विद्यार्थ्यांमध्येही नाराजी निर्माण झाली आहे.