Skip to content
Menu

मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा; १२ सप्टेंबरला अंतरवालीत बैठक, त्यानंतर मुंबईकडे कूच

September 7, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज दहावा दिवस आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी पुढील आंदोलनाबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. १२ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची बैठक होणार असून, या बैठकीनंतर मुंबईकडे जाण्याची पुढील दिशा ठरवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना सध्या अंतरवालीकडे गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. १२ सप्टेंबर रोजी राज्यभरातील मराठा बांधवांनी बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे त्यांनी म्हटले आहे.

‘१२ तारखेला सर्वांनी अंतरवालीत या’

जरांगे पाटील म्हणाले की, “आताच कोणीही अंतरवालीकडे गर्दी करू नका. १२ सप्टेंबरची तारीख निश्चित झाली आहे. त्या दिवशी सर्व मराठा बांधवांनी अंतरवालीत बैठकीसाठी यावे. मुंबईकडे कधी आणि कशा पद्धतीने जायचे, याचा निर्णय या बैठकीनंतर घेतला जाईल.”

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, नवी मुंबईसह राज्यातील विविध भागांतील मराठा समाजबांधवांनी प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले. नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत तसेच नांदेड, सांगली, सातारा, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथील समाजबांधवांनीही १२ सप्टेंबरला अंतरवालीत यावे, असे त्यांनी सांगितले.

बैठकीसाठी विशेष व्यवस्था

१२ सप्टेंबरच्या बैठकीसाठी अंतरवाली सराटी येथे आवश्यक व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली. साउंड सिस्टीम, एलईडी स्क्रीन तसेच बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे. बैठकीला कितीही संख्या असली तरी सर्वांनी सहभागी व्हावे, असे त्यांनी म्हटले.

बैठकीनंतर मुंबईकडे जाण्याची तारीख निश्चित केली जाईल. त्यानंतर मराठा समाज मुंबईच्या दिशेने रवाना होईल, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

‘पोलिसांशी संघर्ष करू नका’

दरम्यान, मुंबईकडे आंदोलनासाठी जाताना पोलिसांशी संघर्ष न करण्याचे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले. पोलिसांबाबत आक्रमक भूमिका न घेता सरकारविरोधात आपला लढा असल्याचे स्पष्ट करावे, असे त्यांनी सांगितले.

तसेच, आंदोलनादरम्यान पोलिसांकडून कोणताही हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यास परिस्थिती चिघळू शकते, असा इशाराही त्यांनी दिला. सरकारच्या भूमिकेमुळे मराठा समाजातील रोष वाढत असल्याचा दावा करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली.

आता १२ सप्टेंबरच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, या बैठकीत मुंबईकडे जाण्याबाबत कोणता निर्णय घेतला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.