Skip to content
Menu

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; सुप्रिया सुळे आंदोलनात सहभागी, सरकारकडे चर्चेची मागणी

September 7, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या

पुणे : MPSC परीक्षेतील पेपरफुटीच्या आरोपांवरून पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा सुरू असून, या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या. त्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्यांवर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी केली.

पेपरफुटीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कायमस्वरूपी आणि ठोस उपाययोजना करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. आंदोलनात विद्यार्थिनींचीही मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.

‘विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी जबाबदार व्यक्ती पाठवा’

आंदोलनात सहभागी झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी जबाबदार व्यक्तीला चर्चेसाठी पाठवावे, असे त्यांनी म्हटले.

“विद्यार्थी चर्चेसाठी तयार आहेत. मात्र, त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी सरकारकडून कोण येणार, हा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे, नोकरी करावी आणि देशाची सेवा करावी. त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येणे हे दुर्दैवी आहे,” असे सुळे म्हणाल्या.

सरकारने तातडीने जबाबदार प्रतिनिधी पाठवून विद्यार्थ्यांशी चर्चा करावी आणि त्यांच्या समस्यांवर मार्ग काढावा, अशी मागणीही त्यांनी केली.

‘पेपरफुटी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा’

पेपरफुटीच्या मुद्द्यावर बोलताना सुळे यांनी परीक्षांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करण्याची गरज व्यक्त केली.

“जगभरात अनेक स्पर्धात्मक परीक्षा घेतल्या जातात. भारतातही विविध परीक्षा होतात. मग काही परीक्षांमध्येच पेपरफुटीच्या घटना का घडतात? आज एआय आणि आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्याचा वापर करून पेपरफुटी रोखण्यासाठी प्रभावी उपाय करता येऊ शकतात,” असे त्या म्हणाल्या.

पेपरफुटी रोखणे अशक्य आहे, असे मानण्याचे कारण नाही. सरकारने याबाबत ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अध्यक्ष आणि सचिवांच्या राजीनाम्याच्या मागणीवरही विचार करण्याचे आवाहन

सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन लवकरात लवकर तोडगा काढावा, असे आवाहन केले.

मोर्चाला झालेली मोठी गर्दी विद्यार्थ्यांमधील असंतोष आणि आक्रोश दर्शवत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, विद्यार्थी वेळोवेळी संबंधित अध्यक्ष आणि सचिवांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. या मागणीवरही सरकारने गांभीर्याने विचार करावा, असे सुळे यांनी म्हटले.

“सर्व विद्यार्थी आपलीच मुले आहेत. त्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. सरकारने संवादातून मार्ग काढला पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.