Skip to content
Menu

ठाण्यात गोविंदा पथकांची रंगणार चुरस ;यंदा १० थरांचा विक्रम करण्याचा निर्धार

September 5, 2026
महाराष्ट्र

मुंबई : गोपाळकाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात शनिवारी दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचणार आहे. यंदा १० थरांची मानवी मनोरे उभारण्याच्या उद्देशाने मुंबई आणि परिसरातील गोविंदा पथकांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ठाण्यातील प्रमुख दहीहंड्यांवर गोविंदांच्या थरारक कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या वर्षी मुंबई आणि ठाण्यात ९ आणि १० थरांसाठी मोठी स्पर्धा झाली होती. जोगेश्वरीच्या ‘कोकण नगर’ आणि ‘जय जवान’ या पथकांनी १० थरांची यशस्वी सलामी देत विक्रम नोंदवला होता. यंदा ‘आर्यन्स’ गोविंदा पथकानेही १० थरांच्या शर्यतीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

‘जय जवान’ पथकाकडून सकाळी जोगेश्वरी येथे मानाचे पहिले ५ ते ६ थर उभारण्यात येणार आहेत. त्यानंतर लिंक रोडवरील संकटमोचन हनुमान मंदिरातील मानाची हंडी फोडून पथक ठाण्याच्या दिशेने रवाना होणार आहे. या पथकात सुमारे ६०० ते ७०० गोविंदा सहभागी असून, त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने समर्थकही असणार आहेत. प्रवासासाठी आठ बस आणि दोन ट्रकची व्यवस्था करण्यात आली आहे.

ठाण्यात मोठ्या बक्षिसांची पर्वणी

ठाण्यातील हिरानंदानी परिसरातील दहीहंडी यंदाही आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. या आयोजनासाठी तब्बल ५१ लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. याशिवाय वर्तकनगरसह शहरातील विविध प्रमुख दहीहंडी उत्सवांमध्ये गोविंदा पथके सहभागी होणार आहेत. घाटकोपरमधील गणेश चुक्कल यांच्या दहीहंडीलाही पथकांकडून प्राधान्य दिले जाणार आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने सात थरांची सलामी

माझगावच्या ताडवाडी येथील श्री दत्त क्रीडा मंडळाने यंदा नियोजनबद्ध पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी श्री दत्त मंदिरात पाच थरांची मानाची हंडी फोडल्यानंतर पथक मुंबईतील प्रमुख दहीहंड्यांना भेट देणार आहे. सुरक्षेचा विचार करून सात थरांची सलामी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

महिला गोविंदाही ठाण्यात दाखल होणार

जोगेश्वरी पूर्व येथील जोगेश्वरी माता महिला गोविंदा पथकाकडूनही यंदा उत्साहात सहभाग घेतला जाणार आहे. सकाळी मजासवाडी मैदानावर सहा थरांची सलामी दिल्यानंतर पथक ठाण्याकडे रवाना होईल. ठाण्यातील प्रमुख दहीहंड्यांमध्ये सहभागी होऊन सहा थरांची सलामी देण्याचा पथकाचा मानस आहे.

‘आर्यन्स’चे १० थरांचे लक्ष्य

‘आर्यन्स’ गोविंदा पथकाने यंदा १० थरांचा मनोरा यशस्वीपणे उभारण्याचा निर्धार केला आहे. या पथकाने यापूर्वी ९ थरांची सलामी २१ ते २२ वेळा यशस्वी केली आहे. गेल्या वर्षी १० थरांचा प्रयत्न अपुरा ठरला होता. त्यामुळे यंदा १० थरांचा विक्रम पूर्ण करण्यासाठी पथकाने विशेष तयारी केली आहे. ठाण्यातील प्रमुख दहीहंड्यांवर १० थर उभारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.