पुणे : सण-उत्सव आनंद आणि उत्साहाचे असावेत; मात्र डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे सणांचे मूळ गांभीर्यच हरवत चालले आहे, अशी भूमिका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली. एखाद्या व्यक्तीने आपले मत मांडल्यामुळे त्याच्यावर हल्ला होत असेल, तर हा केवळ त्या व्यक्तीवरील हल्ला नसून लोकशाही आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवरील आघात असल्याचेही त्यांनी म्हटले.
विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले की, बापट यांची आपली वैयक्तिक ओळख नाही. मात्र, ते ज्या विषयावर बोलत आहेत, त्यामागे निश्चितच काही भूमिका आणि अर्थ आहे. मत व्यक्त केल्यामुळे एखाद्या व्यक्तीवर हल्ला करणे कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
अशा घटनांकडे पुणे पोलिस आयुक्त आणि राज्य सरकारने अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे पवार यांनी सांगितले. बापट यांच्यावरील हल्ल्याचा अनेकांनी निषेध केला असून, त्या भूमिकेशी आपणही सहमत असल्याचे त्यांनी नमूद केले.
“अशा घटना थांबल्या पाहिजेत. उत्सवांमध्ये डीजेच्या वापराबाबत डीजेमुक्तीसारखे निर्णय घेण्याची गरज आहे,” असे पवार यांनी म्हटले.
‘मुद्द्याला गुद्द्याने उत्तर देता येत नाही’
हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देताना विद्यानंद बापट यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना एका व्यक्तीने अचानक येऊन आपल्यावर हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले.
“मी सशस्त्र नव्हतो. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा प्रकार करण्यात आला. एखाद्या मुद्द्याला उत्तर द्यायचे असेल तर ते चर्चेतून किंवा विचारातून द्यावे; गुद्द्याने नाही,” असे बापट यांनी म्हटले.
आपला गणेशोत्सव किंवा कोणत्याही उत्सवाला विरोध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, कर्णकर्कश आवाज आणि डीजेमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाला आपला विरोध असल्याचे बापट यांनी सांगितले.
पुण्यात साऊंड सिस्टीमवर पोलिसांचे निर्बंध
दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी साऊंड सिस्टीमच्या वापराबाबत काही मर्यादा निश्चित केल्या आहेत. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी चार बेस आणि चार टॉप एवढ्याच क्षमतेत साऊंड सिस्टीम वापरण्याचे निर्देश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
साऊंड सिस्टीममधील बेसमधून प्रामुख्याने जड आणि कंपन निर्माण करणारा आवाज येतो. तर टॉप स्पीकरमधून गायकाचा आवाज, गाण्याचे शब्द, भाषणे आणि वाद्यांचे स्वर अधिक स्पष्टपणे ऐकू येतात.
गणेशोत्सवाच्या काळात ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असतानाच शरद पवार यांनी डीजेच्या कर्णकर्कश आवाजाविरोधात भूमिका मांडली आहे. त्यामुळे पुण्यातील उत्सवांमधील ध्वनीप्रदूषण आणि डीजेच्या वापराबाबतची चर्चा आणखी रंगण्याची शक्यता आहे.