Skip to content
Menu

४ तास ढिगाऱ्याखाली अडकल्या ९७ वर्षीय गुना माया

September 3, 2026
देश-विदेश,मुख्य बातम्या

काठमांडू : नेपाळमध्ये २६ ऑगस्टला आलेल्या भीषण पुरामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. या महापुरातून ९७ वर्षीय गुना माया बोहरा यांची झालेली सुटका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नुवाकोट जिल्ह्यातील देविघाट येथे नदीकाठी असलेल्या वृद्धाश्रमाच्या तळमजल्यावर त्या राहत होत्या. पुराचे पाणी अचानक वृद्धाश्रमात शिरल्याने त्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या आणि ढिगाऱ्याखाली अडकल्या.

गुना माया तब्बल चार तास ढिगाऱ्याखाली अडकून होत्या. पाण्याचा प्रवाह कमी असलेल्या ठिकाणी त्या अडकल्याने त्यांचा जीव वाचला. दरम्यान, त्यांच्या नातेवाईकांनी जेसीबीच्या मदतीने घटनास्थळी धाव घेतली. सैन्य आणि पोलिसांच्या मदतीने बचावकार्य राबवून त्यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले.

बचावानंतर गुना माया यांना उपचारासाठी काठमांडू येथील बीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर त्या फारसे बोलत नसून वारंवार एकच प्रश्न विचारत आहेत— ‘पाण्याने मला का मारले?’ त्यांच्या या प्रश्नातून त्यांनी अनुभवलेल्या भीषण प्रसंगाची तीव्रता जाणवते.

दरम्यान, नेपाळमधील या महापुरातील मृतांचा आकडा १,२४३ वर पोहोचला आहे. भोटेकोशी नदीच्या प्रवाहात तसेच भूमिगत पॉवरहाऊसच्या बोगद्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांचा शोध अद्याप सुरू आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.