नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. १३ सप्टेंबरपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर ही मालिका सुरू होणार आहे. श्रेयस अय्यरकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून, तिलक वर्माची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
या संघात युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी मिळाली आहे. तसेच यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसनचेही संघात पुनरागमन झाले आहे. मात्र, हार्दिक पांड्याला या मालिकेसाठी संघात स्थान मिळालेले नाही.
संजू सॅमसनचे पुनरागमन
टी-२० विश्वचषकानंतर संजू सॅमसन चर्चेत आला होता. मात्र, आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकांमध्ये अपेक्षित कामगिरी न झाल्याने त्याला प्लेइंग-११ मधून बाहेर करण्यात आले होते.
दरम्यान, वैभव सूर्यवंशीला इंग्लंडमध्ये संधी मिळाली होती. त्याला तिथे विशेष प्रभाव पाडता आला नसला तरी झिम्बाब्वे दौऱ्यात त्याने दमदार फलंदाजी करत प्लेअर ऑफ द सीरिजचा पुरस्कार मिळवला. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी त्याच्यावर पुन्हा विश्वास दाखवण्यात आला आहे.
बुमराहसह चार खेळाडूंच्या फिटनेसवर लक्ष
संघात जसप्रीत बुमराहचा समावेश करण्यात आला आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर बुमराहने अद्याप सामना खेळलेला नाही. त्यामुळे त्याच्या फिटनेसकडे सर्वांचे लक्ष असेल.
बुमराहसोबत नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या फिटनेस चाचण्या बाकी आहेत. हे खेळाडू फिटनेस टेस्ट उत्तीर्ण झाल्यानंतरच मालिकेत खेळू शकतील.
रिंकू सिंहसह आठ खेळाडू बाहेर
झिम्बाब्वे दौऱ्यात टी-२० संघाचा भाग असलेल्या रिंकू सिंहला यावेळी स्थान मिळालेले नाही. त्याच्यासह प्रिन्स यादव, अशोक शर्मा, मयंक यादव, सूर्यांश शेडगे, यश ठाकूर, प्रभसिमरन सिंह आणि हर्ष दुबे यांनाही संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.
अफगाणिस्तानविरुद्ध भारताचा १५ सदस्यीय संघ
- श्रेयस अय्यर – कर्णधार
- अभिषेक शर्मा
- वैभव सूर्यवंशी
- संजू सॅमसन – यष्टिरक्षक
- ईशान किशन – यष्टिरक्षक
- तिलक वर्मा – उपकर्णधार
- शिवम दुबे
- नीतीश कुमार रेड्डी
- अक्षर पटेल
- वॉशिंग्टन सुंदर
- वरुण चक्रवर्ती
- रवी बिश्नोई
- जसप्रीत बुमराह
- अर्शदीप सिंह
- हर्षित राणा
अफगाणिस्तानविरुद्धची तीन सामन्यांची टी-२० मालिका १३ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, या मालिकेत युवा खेळाडूंना मिळणारी संधी आणि बुमराहच्या पुनरागमनाकडे विशेष लक्ष असणार आहे.