गौतम गंभीर वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत व्यस्त; २०२३ची सुवर्णकामगिरी पुन्हा करण्याचे आव्हान
नवी दिल्ली : आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी माजी दिग्गज फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. जपानमधील आयची-नागोया येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी प्रशिक्षकांची घोषणा करण्यात आली असून, त्यातून लक्ष्मण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
लक्ष्मण सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सेंटर ऑफ एक्सलन्सचे संचालक आहेत. नियमित मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे २७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघासोबत असणार आहेत. त्यामुळे आशियाई स्पर्धेतील भारतीय संघाच्या मार्गदर्शनाची जबाबदारी लक्ष्मण यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
लक्ष्मण यांना प्रशिक्षक म्हणून आशियाई स्पर्धेचा अनुभवही आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय पुरुष संघाने २०२३च्या हँगझू आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेतही भारताला विजेतेपद मिळवून देण्याची जबाबदारी लक्ष्मण यांच्यासमोर असेल.
लक्ष्मण यांच्या प्रशिक्षण पथकात सुनील जोशी, हृषीकेश कानिटकर आणि शुभदीप घोष हे सहाय्यक म्हणून काम पाहणार आहेत. संघाची तयारी आणि स्पर्धेतील कामगिरी सुधारण्याच्या दृष्टीने या प्रशिक्षक पथकाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
दरम्यान, भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अमोल मुझुमदार कायम राहणार आहेत. त्यांना गोलंदाजी प्रशिक्षक आविष्कार साळवी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक मुनीश बळी यांची साथ मिळणार आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेटचे सामने २४ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, भारतीय पुरुष संघाचा पहिला सामना २८ सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे स्पर्धेपूर्वी संघाची योग्य बांधणी करून पुन्हा एकदा सुवर्णपदकावर नाव कोरण्याचे लक्ष्य लक्ष्मण यांच्या नेतृत्वाखालील पथकासमोर असेल.