Skip to content
Menu

लेकींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई; मॅरेथॉनमध्ये तरुणींनाही मागे टाकत मिळवला प्रथम क्रमांक

August 31, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या

अंबाजोगाई : ना महागडे स्पोर्ट्स शूज, ना ट्रॅकसूट, ना प्रशिक्षक… केवळ रोजच्या कष्टातून मिळालेली ताकद आणि मुलींच्या उज्ज्वल भवितव्याची जिद्द घेऊन ४७ वर्षीय रमाबाई रणवीर यांनी मॅरेथॉनमध्ये धाव घेतली. विशेष म्हणजे, साडी नेसून आणि स्लीपर हातात घेऊन अनवाणी धावत त्यांनी तरुण स्पर्धकांना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला. या कामगिरीबद्दल त्यांना तीन हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर शैक्षणिक संकुलाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शनिवारी ‘अमृत दौड’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भगवानबाबा चौक या मार्गावर झालेल्या या स्पर्धेत रमाबाई सहभागी झाल्या.

स्पर्धेच्या सुरुवातीला त्या इतर स्पर्धकांमध्ये साधी साडी नेसून उभ्या होत्या. धावण्याची शिट्टी वाजताच त्यांनीही वेग घेतला. सुरुवातीला तरुण-तरुणी त्यांच्यापेक्षा पुढे गेले. मात्र काही अंतरानंतर पायातील स्लीपर वारंवार निसटू लागल्याने त्यांनी स्लीपर हातात घेतले आणि अनवाणी धावण्यास सुरुवात केली.

पावसामुळे गार झालेला रस्ता, पायाखाली टोचणारे खडे आणि अंगावर साडी अशा परिस्थितीतही त्यांची धाव थांबली नाही. साडीचा पदर सांभाळत त्यांनी एकामागून एक ट्रॅकसूटधारी स्पर्धकांना मागे टाकले आणि अखेर फिनिशिंग लाइन सर्वप्रथम पार केली. त्यांच्या या अनपेक्षित विजयाने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. टाळ्यांच्या कडकडाटात रमाबाईंचे अभिनंदन करण्यात आले.

बक्षीस स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना रमाबाई म्हणाल्या, “पोरांच्या संसारासाठी रोज धावपळ करते, आज स्वतःसाठी धावले.” त्यांच्या या शब्दांनी उपस्थितांचे मन हेलावून गेले.

मुलींच्या शिक्षणासाठी हिंगोली सोडले

पतीच्या निधनानंतर दोन्ही मुलींच्या शिक्षणाची आणि संगोपनाची संपूर्ण जबाबदारी रमाबाई यांच्या खांद्यावर आली. मुलींना चांगले शिक्षण देऊन त्यांचे भविष्य घडविण्यासाठी त्यांनी मूळ गाव हिंगोली सोडून अंबाजोगाईत वास्तव्यास येण्याचा निर्णय घेतला.

अंबाजोगाईत त्या विविध कुटुंबांकडे स्वयंपाकाचे काम करून उदरनिर्वाह करतात. रोजच्या कष्टातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्या मुलींच्या शिक्षणासाठी पैसे बाजूला ठेवतात. याच संघर्षातून वेळ काढत त्यांनी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला आणि जिद्द, मेहनत व आत्मविश्वासाच्या जोरावर प्रथम क्रमांक मिळवला.

रमाबाईंची ही कामगिरी केवळ मॅरेथॉनमधील विजय नसून, मुलींच्या भविष्यासाठी संघर्ष करणाऱ्या आईच्या जिद्दीचे प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे.