काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुराने अनेक भागांमध्ये हाहाकार माजवला आहे. पूराच्या तडाख्यात अनेक गावांशी संपर्क तुटला असून, जलप्रलयाच्या या संकटातून अनेक हृदयद्रावक तसेच थरारक घटना समोर येत आहेत. याचदरम्यान उत्तरगया पब्लिक स्कूलमध्ये घडलेली एक घटना शेकडो विद्यार्थ्यांसाठी एका अनोळखी व्यक्तीचा इशारा किती महत्त्वाचा ठरू शकतो, हे दाखवून देणारी आहे.
‘महापूर आलाय, पळा…!’ असा दिला इशारा
बुधवारी सकाळी त्रिशूली बाजारापासून काही अंतरावर असलेल्या बेत्रावती परिसरातील उत्तरगया पब्लिक स्कूलजवळ अचानक एक अनोळखी व्यक्ती धावत आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याने मोठ्याने ‘महापूर आलाय, पळा…!’ असा इशारा देत शाळेतील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सावध केले.
त्यावेळी शाळेतील दिवसाची सुरुवात नुकतीच झाली होती. हॉस्टेलमधील काही विद्यार्थी न्याहारी करत होते. प्रशासनाकडून कोणताही सायरन किंवा अधिकृत संदेश आलेला नसतानाच त्या व्यक्तीने दिलेला इशारा शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला.
काही मिनिटांतच परिसर पाण्याखाली
इशारा मिळताच शिक्षकांनी क्षणाचाही विलंब न करता विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली. दरम्यान, पुराचे पाणी आणि चिखलाचा वेगाने येणारा प्रवाह मुख्य रस्ते आणि बाहेर पडण्याचे मार्ग अडवत होता.
परिस्थिती आणखी बिघडण्यापूर्वी ३७० हून अधिक विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारामागील डोंगराळ जंगलाच्या दिशेने धाव घेतली. मोठ्या विद्यार्थ्यांनी स्वतःचा मार्ग शोधत सुरक्षित भाग गाठला.
शिक्षकांनी लहान मुलांना उचलून नेले
सातवी ते दहावीतील मोठ्या विद्यार्थ्यांनी जंगलाच्या दिशेने धाव घेतली, तर शिक्षकांनी लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्याची जबाबदारी घेतली. काही लहान विद्यार्थ्यांना वेगाने धावता येत नसल्याने शिक्षकांनी त्यांना कडेवर उचलून घेत चिखलातून वाट काढत डोंगराच्या दिशेने नेले.
एकीकडे पुराचे पाणी वेगाने वाढत होते, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यासाठी शिक्षकांची धावपळ सुरू होती. काही मिनिटांच्या या गोंधळात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश आले.
‘तो इशारा नसता तर…?’
प्रशासनाचा अधिकृत इशारा मिळण्यापूर्वीच एका अनोळखी व्यक्तीने दिलेली माहिती विद्यार्थ्यांसाठी जीवनदायी ठरली. वेळीच मिळालेल्या या इशाऱ्यामुळे ३७० हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांचा जीव वाचला, अशी माहिती समोर आली आहे.
पूर ओसरल्यानंतर या घटनेची माहिती समोर आली तेव्हा शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनी त्या अज्ञात व्यक्तीचे आभार मानले. मात्र, जीव वाचविण्यासाठी धावून आलेला हा ‘देवदूत’ नेमका कोण होता, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.