नवी दिल्ली : भारताचा स्टार भालाफेकपटू आणि दोन वेळचा ऑलिम्पिक पदकविजेता नीरज चोप्रा याच्या दुखापतीने पुन्हा एकदा त्याच्या कारकिर्दीला मोठा धक्का बसला आहे. सरावादरम्यान घोट्याचे लिगामेंट फाटल्याने नीरजला २०२६ च्या उर्वरित संपूर्ण हंगामातून माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे आगामी आशियाई क्रीडा स्पर्धा तसेच डायमंड लीग फायनलमध्ये सहभागी होण्याचे त्याचे स्वप्न भंगले आहे.
नीरजने शनिवारी (२९ ऑगस्ट) सोशल मीडिया पोस्टद्वारे हंगामातून माघार घेत असल्याची माहिती दिली. सरावादरम्यान घोट्याला गंभीर दुखापत झाल्याचे त्याने सांगितले. डॉक्टर तसेच आपल्या टीमशी चर्चा केल्यानंतर उर्वरित स्पर्धांमधून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे नीरजने स्पष्ट केले.
दीर्घ विश्रांतीनंतर केले होते पुनरागमन
दुखापतीमुळे दीर्घकाळ मैदानापासून दूर राहिल्यानंतर नीरजने जूनमध्ये दोहा डायमंड लीगमधून पुनरागमन केले होते. या स्पर्धेत त्याने ८५.६९ मीटर भालाफेक करत चौथे स्थान मिळवले.
यानंतर ग्लासगो येथे त्याने ८५.८३ मीटर फेक करत रौप्यपदकावर नाव कोरले. त्यानंतर लॉझेन डायमंड लीगमध्ये त्याने यंदाची सर्वोत्तम कामगिरी नोंदवत आपला फॉर्म परत मिळवत असल्याचे संकेत दिले होते.
आशियाई स्पर्धेपूर्वीच मोठा धक्का
नीरजची लॉझेनमधील स्पर्धा आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात होती. मात्र, दुखापतीमुळे आता त्याला या स्पर्धेलाही मुकावे लागणार आहे.
ग्लासगो स्पर्धेत नीरजला रौप्यपदक मिळाले होते. श्रीलंकेच्या रुमेश पाथिरागेने ८९.७५ मीटरची जबरदस्त फेक करत सुवर्णपदक पटकावले होते.
डायमंड लीग फायनलची संधीही हुकली
नीरजच्या दुखापतीचा फटका डायमंड लीग फायनलच्या शर्यतीलाही बसला आहे. गुणतालिकेत तो सातव्या स्थानावर असून अंतिम फेरीसाठी तो शर्यतीत होता. मात्र, आता संपूर्ण उर्वरित हंगामातूनच माघार घेतल्याने त्याचे डायमंड लीग फायनलमध्ये खेळण्याचे स्वप्नही भंगले आहे.
दीर्घ विश्रांतीनंतर दमदार पुनरागमन करत असतानाच दुखापतीने पुन्हा त्याचा मार्ग रोखला आहे. त्यामुळे नीरजच्या चाहत्यांसाठी ही मोठी निराशाजनक बातमी ठरली आहे.