मुंबई : भारताच्या टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सूर्यकुमार यादवने पहिल्यांदाच याबाबत जाहीरपणे भाष्य केले आहे. माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राच्या यूट्यूब चॅनेलवरील संवादात सूर्याने कर्णधारपद गमावल्यापासून मनात सुरू असलेल्या विचारांचा खुलासा केला. जवळपास दीड महिना आपण याच विषयावर विचार करत होतो, असे त्याने सांगितले.
सूर्यकुमारला २०२८ लॉस एंजेलिस ऑलिम्पिक आणि त्यानंतरच्या टी-२० विश्वचषकापर्यंत भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची अपेक्षा होती. मात्र, २०२६ चा टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर निवड समितीने त्याच्याकडून कर्णधारपदाची जबाबदारी काढून घेत श्रेयस अय्यरकडे नेतृत्व सोपवले. त्यानंतर आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकांसाठीही सूर्याची संघात निवड झाली नाही.
‘मी स्वतःला निवड समितीच्या जागी ठेवले’
संघातून वगळल्यानंतर सूर्याने परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला. आपण निवड समितीच्या भूमिकेत असतो तर भविष्यासाठी संघात बदल का केले असते, याचा विचार केल्याचे त्याने सांगितले.
संघाच्या निवडीत आपले नाव नसल्याचे समजल्यानंतरही आपण सकारात्मक राहण्याचा प्रयत्न केला, असे सूर्याने सांगितले. सामन्यांमध्ये दबावाच्या परिस्थितीला सामोरे जाताना ज्याप्रमाणे शांत राहण्याचा प्रयत्न केला, त्याच पद्धतीने या प्रसंगातही स्वतःला सावरल्याचे त्याने स्पष्ट केले.
निवड समितीचा फोन तीन दिवस आधी
संघाची अधिकृत घोषणा होण्याच्या तीन दिवस आधी निवड समितीने आपल्याशी फोनवर संपर्क साधला होता, असा खुलासाही सूर्यकुमारने केला. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी आपली निवड होणार नसल्याचे त्याला त्यावेळी सांगण्यात आले.
या निर्णयावर आपण कोणतीही नाराजी व्यक्त केली नाही. संघाच्या हितासाठीच निवड समितीने हा निर्णय घेतला असेल, असे मानून आपण निर्णय स्वीकारला. ‘तुम्हाला योग्य वेळ वाटेल तेव्हा मला पुन्हा बोलवा, मी खेळत राहीन,’ अशी भूमिका आपण निवड समितीसमोर मांडल्याचे सूर्याने सांगितले.
विश्वचषक जिंकूनही कर्णधारपद गेले
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने ८ मार्च २०२६ रोजी टी-२० विश्वचषक जिंकला. या विजयासह भारताने सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर नाव कोरले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २०२५ चा आशिया कपही जिंकला.
सूर्याच्या नेतृत्वाखाली भारताने ५२ टी-२० सामने खेळले. त्यापैकी ४२ सामन्यांत भारताने विजय मिळवला, तर आठ सामन्यांत पराभव झाला. दोन सामने अनिर्णित राहिले. त्याची विजयाची टक्केवारी ८०.७६ इतकी आहे.
रोहित शर्मानंतर मिळाली होती जबाबदारी
२०२४ मध्ये वेस्ट इंडिजमध्ये झालेला टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्माने या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर सूर्यकुमार यादवकडे भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. आता कर्णधारपदाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे देण्यात आली आहे.
कर्णधारपद गमावल्यानंतर पहिल्यांदाच सूर्याने आपली बाजू मांडल्याने त्याच्या वक्तव्याची क्रिकेटविश्वात चर्चा सुरू झाली आहे.