कर्जत : कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस कर्जत स्थानकात दाखल होताच एका डब्याच्या ब्रेक यंत्रणेतून अचानक धूर निघू लागल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. धूर पाहून घाबरलेल्या काही प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी डब्यातून खाली उतरत थेट रेल्वे रुळांवर उड्या मारल्या. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
शनिवारी (२९ ऑगस्ट) सायंकाळी खंडाळा घाट उतरून कोयना एक्स्प्रेस कर्जत स्थानकात पोहोचली. त्यावेळी ट्रेनच्या मागील बाजूच्या दुसऱ्या डब्याजवळून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे स्थानकावर काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून एक्स्प्रेस सुमारे १० मिनिटे स्थानकात थांबवली. दरम्यान, धूर पाहून काही प्रवाशांनी घाबरून डब्यातून खाली उतरण्यास सुरुवात केली. त्यामुळे स्थानक परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
ब्रेक जाम झाल्याने धूर
रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने संबंधित डब्याची तपासणी केली. तपासणीत कोणताही मोठा धोका नसल्याचे स्पष्ट झाले. ब्रेक जाम झाल्यामुळे चाके आणि ब्रेक यंत्रणेमध्ये जास्त घर्षण होऊन उष्णता निर्माण झाली आणि त्यातून धूर निघाल्याचे समोर आले.
रेल्वे कर्मचाऱ्यांनी आवश्यक तांत्रिक तपासणी करून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर कोयना एक्स्प्रेस सायंकाळी ६ वाजून ३६ मिनिटांनी सुरक्षितपणे मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली.
प्रवाशांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
या घटनेत कोणतीही मोठी दुर्घटना घडली नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रवाशांनी अफवा किंवा सोशल मीडियावरील अपुऱ्या माहितीकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहनही करण्यात आले.
दरम्यान, कर्जत स्थानकात कोयना एक्स्प्रेसमधून धूर निघत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.