Skip to content
Menu

मुंबईकरांना मोठा झटका! पार्किंग शुल्क वाढणार; BMCकडून १० टक्के दरवाढीचा प्रस्ताव

August 29, 2026
महाराष्ट्र,राजकीय

मुंबई : मुंबईकरांच्या खिशाला आता आणखी झळ बसण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने सार्वजनिक तसेच ‘ऑन स्ट्रीट’ पार्किंगच्या शुल्कात १० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव येत्या आठवडाभरात महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे सादर केला जाणार असून, मंजुरीनंतर स्थायी समिती आणि महापालिका सभागृहाची मान्यता घेतली जाणार आहे.

मुंबईत वाहनांची संख्या ५० लाखांहून अधिक झाली असून, वाहनतळांची कमतरता ही मोठी समस्या बनली आहे. सध्या महापालिकेचे ३७ सार्वजनिक वाहनतळ आणि ६७ ‘ऑन स्ट्रीट’ वाहनतळ आहेत. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता बहुमजली तसेच रस्त्यावरील पार्किंग सुविधा वाढविण्यावरही महापालिकेचा भर आहे.

तीन वर्षांपासून शुल्कवाढ नाही

जानेवारी २०१५ मध्ये ‘पे अँड पार्क’ धोरण तयार करताना वाहनतळ शुल्कात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, नागरिक आणि राजकीय पक्षांच्या विरोधामुळे राज्य सरकारने या निर्णयाला स्थगिती दिली होती. ही स्थगिती दोन वर्षांनंतर उठवण्यात आली.

त्यानंतर २०२२ पासून महापालिकेत प्रशासकीय कारभार सुरू असल्याने गेल्या तीन वर्षांत पार्किंग शुल्कात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता १० टक्के शुल्कवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

४६.४० टक्के वाढीचा प्रस्तावही चर्चेत

गेल्या तीन ते चार वर्षांत शुल्कवाढ झालेली नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी यापूर्वी ४६.४० टक्के शुल्कवाढीचा प्रस्ताव तयार करून आयुक्तांकडे सादर केला होता. मात्र, आता त्याऐवजी दोन वर्षांसाठी १० टक्के शुल्कवाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्रस्तावाला आयुक्तांची मंजुरी आणि त्यानंतर स्थायी समिती व सभागृहाची मान्यता मिळाल्यास मुंबईतील पार्किंग महागणार आहे.