काठमांडू : नेपाळमध्ये भीषण पुरामुळे मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली असताना, माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनाही समोर येत आहेत. भोटेकोशी नदीच्या पुराच्या प्रवाहात वाहून आलेला बँकेचा लॉकर फोडून त्यातील रोख रक्कम लुटल्याच्या आरोपावरून २९ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून तब्बल ९२ लाख ६८ हजार ५०५ नेपाळी रुपये जप्त करण्यात आले आहेत.
रसुवा जिल्ह्यातील भोटेकोशी परिसरातून पुराच्या पाण्यात वाहून गेलेला हा जड लॉकर धादिंग जिल्ह्यातील गल्छी गावपालिका-४ येथील बेलखूखोला परिसरात त्रिशूली नदीच्या काठावर आढळून आला. स्थानिक नागरिक लॉकर फोडून त्यातील पैसे काढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच नेपाळ पोलीस आणि सशस्त्र प्रहरी बलाच्या संयुक्त पथकाने घटनास्थळी धाड टाकली. पोलिसांनी २९ जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडील ९२ लाखांहून अधिक नेपाळी रुपयांची रोख रक्कम जप्त केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले बहुतांश आरोपी गल्छी-४ येथील मास्टर गावातील रहिवासी आहेत. काही जण गल्छी-६ आणि सिद्धलेक-७ परिसरातील असून, चितवन आणि पर्सा येथील काही नागरिकांचाही त्यात समावेश आहे. हा लॉकर नेमका कोणत्या बँकेचा आहे आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.
मृत महिलेच्या दागिन्यांचीही चोरी
पुराच्या संकटात चोरीची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नारायणी नदीजवळ पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या एका मृत महिलेच्या कानातील सोन्याच्या बाळ्या दोन व्यक्तींनी काढून घेतल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.
नेपाळमध्ये ६२६ जणांचा मृत्यू
नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम कमीकरण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाच्या शनिवारीच्या आकडेवारीनुसार, या भीषण पुरात आतापर्यंत ६२६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर बेपत्ता व्यक्तींची संख्या २,४२६ वर पोहोचली आहे. यामध्ये ५१७ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. प्रभावित भागांमध्ये बचाव आणि मदतकार्य सुरू आहे.