Skip to content
Menu

नेपाळ-तिबेट सीमेवर पुन्हा संकट! आणखी एक तलाव फुटला; अनेक गावे रिकामी, मृतांचा आकडा ४७८ वर

August 28, 2026
देश-विदेश,मुख्य बातम्या

काठमांडू : नेपाळ आणि तिबेटमध्ये पूर व भूस्खलनामुळे निर्माण झालेले संकट अद्याप कायम असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नेपाळ-तिबेट सीमेजवळील आणखी एक तलाव फुटल्याने परिसरातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन भोटेकोशी, त्रिशुली आणि नारायणी नद्यांच्या परिसरातील अनेक गावे रिकामी करण्यात येत आहेत.

या नैसर्गिक आपत्तीत नेपाळ आणि तिबेटमध्ये आतापर्यंत ४७८ जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे १,५०० हून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. बेपत्ता व्यक्तींमध्ये सुमारे २९० भारतीय नागरिकांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

चीनने दिला होता तलाव फुटण्याचा इशारा

चोचेन नदी आणि पुरेपु त्सांगपो नदीच्या संगमाजवळ हा तलाव तयार झाला होता. तो फुटण्याची शक्यता असल्याचा इशारा चीनकडून एक दिवस आधीच देण्यात आला होता. अखेर तलाव फुटल्यानंतर परिसरातील पाणीपातळी वाढू लागली आहे.

धोका वाढल्याने नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात सुरू असलेले बचावकार्य सुमारे ९० मिनिटांसाठी थांबवण्यात आले. भोटेकोशी, त्रिशुली आणि नारायणी नदीच्या काठावरील नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तिबेटमध्येही बचावकार्याला ब्रेक

तिबेटमध्येही पुराच्या नव्या धोक्यामुळे मदत आणि बचावकार्यावर परिणाम झाला आहे. दुसऱ्या पुराच्या शक्यतेचा हवाला देत चीनने काही भागातील बचावकार्य तात्पुरते स्थगित केले असून, लेव्हल-४चा इशारा जारी करण्यात आला आहे.

नेपाळमध्ये ४७५ जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये आतापर्यंत ४७५ जणांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी झाल्याचे सांगण्यात आले आहे. तब्बल ९७७ जण अद्याप बेपत्ता आहेत. बेपत्ता व्यक्तींमध्ये ५१७ परदेशी नागरिक, नेपाळी लष्कराचे ४५ जवान आणि नेपाळ पोलिसांचे ४१ कर्मचारी यांचा समावेश आहे.

तिबेटमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर ५५८ जण बेपत्ता आहेत. यातील २६० जण परदेशी नागरिक असल्याचे सांगण्यात येत आहे.

खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे

नेपाळमधील दुर्गम भाग आणि प्रतिकूल हवामानामुळे मदत व बचाव पथकांसमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत. मात्र, परिस्थिती गंभीर असतानाही लष्कर आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बचावकार्य सुरू असल्याचे नेपाळच्या विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.

वरच्या भागातील परिस्थितीवर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून असून, केंद्र, राज्य आणि स्थानिक प्रशासन समन्वयाने मदतकार्य करत आहे. नव्या तलाव फुटीमुळे नदीकाठच्या भागात धोका वाढल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.