रायगड : कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून भारतात परतत असताना तिबेटमधील सागा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील ३७ भाविकांच्या सुटकेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या हस्तक्षेपानंतर शुक्रवारी (२८ ऑगस्ट) सकाळी ६ वाजता सर्व भाविक सागा येथून न्यालम चेक पोस्टमार्गे काठमांडूकडे रवाना झाले.
अलिबाग, रायगड, ठाणे, पुणे आणि डोंबिवली परिसरातील हे भाविक कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. यात्रा पूर्ण झाल्यानंतर परतीच्या मार्गावर सागा येथे ते अडकून पडले होते. दरम्यान, काठमांडूहून त्यांचे भारतात परतण्याचे विमान शनिवारी (२९ ऑगस्ट) दुपारी २ वाजता असल्याने त्यांना निर्धारित वेळेत काठमांडू गाठणे आवश्यक होते.
मुख्यमंत्री फडणवीसांचा तातडीने हस्तक्षेप
भाविक सागा येथे अडकल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधला. भाविकांच्या सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक प्रशासकीय आणि समन्वयाची कार्यवाही करण्यात आली. त्यानंतर सागा येथून काठमांडूकडे जाण्याचा मार्ग खुला झाला.
शुक्रवारी सकाळी सर्व ३७ भाविक न्यालम चेक पोस्टमार्गे काठमांडूच्या दिशेने रवाना झाले. त्यामुळे शनिवारी नियोजित असलेल्या त्यांच्या विमान प्रवासासाठी वेळेत काठमांडू गाठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भाविकांकडून सरकारचे आभार
संकटाच्या काळात तातडीने मदत आणि सहकार्य मिळाल्याबद्दल भाविकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र सरकार तसेच भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे आभार मानले.
काठमांडूकडे रवाना झालेल्या भाविकांमध्ये रायगड, ठाणे, पुणे आणि डोंबिवली परिसरातील नागरिकांचा समावेश आहे. यामुळे अनेक दिवसांपासून चिंतेत असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.