Skip to content
Menu

धावत्या लोकलमधून तरुणाला लाथ मारून खाली पाडले; पश्चिम रेल्वे मार्गावरील धक्कादायक प्रकार

August 28, 2026
क्राइम,महाराष्ट्र

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील धावत्या लोकलमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरवाजात उभे राहण्यावरून झालेल्या वादानंतर एका प्रवाशाने २४ वर्षीय तरुणाला लाथ मारल्याने तो धावत्या लोकलमधून खाली पडला. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून, रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

जखमी तरुणाचे नाव तौसिफ शेख असून, आरोपीचे नाव राहुलकुमार पांडे (३०) आहे. तौसिफ नालासोपारा येथे राहत असून कारपेंटर म्हणून काम करतो.

बोरिवलीजवळ वादाला सुरुवात

ही घटना २५ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ८.४१ वाजता गोरेगावहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकलमध्ये घडली. राहुलकुमार पांडे हा कांदिवली स्थानकातून लोकलमध्ये चढला होता. प्रवासादरम्यान तौसिफ आणि त्याच्यात दरवाजाजवळ उभे राहण्यावरून वाद सुरू झाला.

बोरिवली स्थानकाजवळ तौसिफने राहुलकुमारला लोकलच्या आत जाण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि काही वेळातच वादाचे रूपांतर झटापटीत झाले.

लाथ मारताच तरुण लोकलमधून खाली पडला

वाद सुरू असतानाच राहुलकुमार पांडेने तौसिफच्या पाठीवर जोरदार लाथ मारली. त्यावेळी लोकल धावत असल्याने तौसिफचा तोल गेला आणि तो चालत्या ट्रेनमधून खाली पडला.

या घटनेत तौसिफ गंभीर जखमी झाला. रेल्वे पोलिसांनी तातडीने त्याला उपचारासाठी नेले. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारांसाठी कांदिवली येथील डॉ. आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तौसिफच्या डोक्याला दुखापत झाली असून त्याला टाकेही घालण्यात आले आहेत.

आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक

तौसिफवर उपचार सुरू असून डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. दरम्यान, या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी राहुलकुमार पांडे याला अटक केली आहे.

किरकोळ कारणावरून झालेल्या वादात तरुणाला धावत्या लोकलमधून खाली पाडल्याने मुंबईतील लोकल प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.