सेंट लुईस : भारताचा युवा बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंदने बुद्धिबळाच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. ‘ग्रँड चेस टूर’चे विजेतेपद पटकावत त्याने हा प्रतिष्ठेचा किताब जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळवला.
गुरुवारी सेंट लुईस येथे झालेल्या अंतिम लढतीत प्रज्ञानंदने गतविजेता फॅबियानो कारुआनाविरुद्ध जबरदस्त पुनरागमन करत विजेतेपदावर कब्जा केला. अंतिम दिवसाची सुरुवात प्रज्ञानंदसाठी आव्हानात्मक होती. कारुआनाच्या तुलनेत तो तब्बल सहा गुणांनी पिछाडीवर होता. मात्र, त्याने दबाव झुगारून देत आपल्या खेळाचा दर्जा उंचावला.
दोन रॅपिड विजयांनी सामन्याचे चित्र पालटले
प्रज्ञानंदने अंतिम दिवशी सलग दोन्ही रॅपिड सामने जिंकत जोरदार कमबॅक केले. या विजयांमुळे त्याने गुणांची आघाडी मिळवली. त्यानंतर झालेल्या ब्लिट्झ सामन्यांमध्ये त्याने कारुआनाला मोठी आघाडी घेण्याची संधी दिली नाही.
पहिल्या ब्लिट्झ सामन्यात वेळेच्या दबावामुळे प्रज्ञानंदकडून चूक झाली. मात्र, कारुआनाला त्याचा फायदा उठवता आला नाही आणि सामना बरोबरीत संपला. अखेर एकूण गुणांमध्ये १५-१३ अशी बाजी मारत प्रज्ञानंदने विजेतेपद निश्चित केले.
कारुआनाविरुद्ध पहिल्या सामन्यात मोठी पिछाडी
या अंतिम लढतीपूर्वी कारुआनाने प्रज्ञानंदला पहिल्या क्लासिकल सामन्यात ६-० असा पराभव केला होता. त्यामुळे भारतीय खेळाडूसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.
मात्र, दुसऱ्या क्लासिकल सामन्यात प्रज्ञानंदने दमदार पुनरागमन करत ३-३ अशी बरोबरी साधली. त्यानंतर रॅपिड आणि ब्लिट्झ प्रकारात केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर त्याने कारुआनावर मात केली.
वेस्ली सोला तिसरे स्थान
दरम्यान, तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत ग्रँडमास्टर वेस्ली सो याने व्हिन्सेंट कीमरचा पराभव केला. रॅपिड फेरीत दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी एक सामना जिंकला. मात्र, ब्लिट्झमध्ये वेस्ली सोने चारही सामने जिंकत एकतर्फी वर्चस्व गाजवले. त्याने १८-१२ अशा फरकाने तिसरे स्थान मिळवले.
प्रज्ञानंदच्या या ऐतिहासिक विजयामुळे भारतीय बुद्धिबळाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.