जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे आंदोलन करण्याचा निर्णय कायम असल्याचे स्पष्ट करत त्यांनी मराठा समाजाला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. ‘‘घरात बसून राहू नका, आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी बाहेर पडा. आपल्यातील आळस आणि मरगळ झटकून टाका,’’ असे आवाहन जरांगे यांनी केले.
राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमची मुदत संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली.
‘अर्ज दिले, नोंदी सापडल्या तरी प्रमाणपत्र मिळाले नाही; त्यांनी आंदोलनात यावे’
राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा समाजात उदासीनता असल्याचे म्हटल्याचा संदर्भ देत जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली. ‘‘ज्यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले, मात्र त्यांचे अर्ज स्वीकारले गेले नाहीत, तसेच नोंदी सापडूनही ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेले नाही, त्यांनी अंतरवाली सराटीत यावे,’’ असे ते म्हणाले.
‘‘कुणीतरी आपल्याला भेटायला येईल, या अपेक्षेवर समाज मोठा होत नाही. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. संधी आता आहे. त्यामुळे घरात न बसता आंदोलनात सहभागी व्हा,’’ असेही त्यांनी सांगितले.
‘विखे, फडणवीस, शिंदेंनी मराठ्यांचा तळतळाट घेऊ नये’
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी करत जरांगे यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला. ‘‘देवेंद्र फडणवीस जसे सांगतात, त्याप्रमाणे विखे पाटील बोलत आहेत. मात्र अधिकाऱ्यांना घेऊन बैठक घेण्यापेक्षा तहसीलदार, एसडीएम आणि जात पडताळणी अधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यावी,’’ असे त्यांनी म्हटले.
मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नका. समाज आक्रमक झाला तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे विखे पाटील, फडणवीस आणि शिंदे यांनी मराठा समाजाचा तळतळाट घेऊ नये, असा इशाराही जरांगे यांनी दिला.
‘सरकारने दिलेही आणि वाटोळेही करत आहे’
‘‘फडणवीस आणि शिंदे यांनी मराठा समाजाला काही गोष्टी दिल्या आहेत; मात्र दुसरीकडे समाजाचे नुकसानही होत आहे. गेल्या काही काळात मी त्यांच्याशी बोललो नाही. मात्र तुम्ही मराठा समाजाचे वाटोळे करत आहात, हे लक्षात आणून देण्यासाठी आम्ही बोलत आहोत,’’ असे जरांगे म्हणाले.
‘५८ लाख नोंदी आम्ही शोधल्या’
मराठा-कुणबी नोंदींच्या मुद्द्यावरही जरांगे यांनी सरकारवर आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘‘आम्ही ५८ लाख नोंदी शोधल्या असून, याची माहिती माध्यमांसमोरही मांडण्यात आली होती. आता या नोंदींची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे,’’ असा दावा त्यांनी केला.
विखे पाटील यांच्यासह उदय सामंत, शंभूराज देसाई आणि इतर मंत्र्यांनी सावध राहावे. मराठा समाजाला योग्य शासन निर्णय द्यावा, अन्यथा सत्तेतील अधिकार टिकवणे कठीण होईल, असा इशाराही जरांगे यांनी दिला.
‘२९ ऑगस्टला अंतरवालीतच आंदोलन; निर्णय झाला नाही तर मुंबईचा मार्ग’
२९ ऑगस्टच्या आंदोलनाबाबत कोणताही संभ्रम नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले. ‘‘२९ ऑगस्टला अंतरवाली सराटीतच आंदोलन होणार आहे. सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर पुढील आंदोलन मुंबईत केले जाईल,’’ असे त्यांनी सांगितले.
मुंबईतील आंदोलनासाठी टप्प्याटप्प्याने मोठ्या संख्येने मराठा समाज सहभागी होईल, असा दावा करत त्यांनी सरकारवर दबाव वाढवला आहे. त्यामुळे २९ ऑगस्टच्या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.