पुणे : राजकारणात घराणेशाहीला मिळणारे महत्त्व आणि जातीच्या आधारावर राजकीय संघटनांची उभारणी यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली. ‘‘आमदाराच्या पोटातून आमदार, खासदाराच्या पोटातून खासदार आणि मंत्र्याच्या पोटातून मंत्री तयार होत आहेत. ही प्रथा आता कुठेतरी थांबली पाहिजे,’’ अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
सामाजिक कार्यकर्ते आणि ‘सरहद’ संस्थेचे संस्थापक संजय नहार यांच्या षट्यब्दीपूर्तीनिमित्त पुण्यातील गणेश कला क्रीडा केंद्रात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीतून ऑनलाइन संवाद साधत संजय नहार यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
‘स्वकर्तृत्वावर मोठे व्हा’
राजकीय कुटुंबात जन्माला येणे हा गुन्हा नाही. मात्र, केवळ आई-वडिलांच्या राजकीय वारशामुळे पुढे जाण्याऐवजी व्यक्तीने स्वतःच्या कर्तृत्वावर आपली ओळख निर्माण केली पाहिजे, असे गडकरी म्हणाले.
‘‘समाजसुधारकाच्या घरातून केवळ राजकारणी नव्हे, तर समाजसुधारकही निर्माण झाले पाहिजेत. आई-वडिलांच्या पुण्याईवर नव्हे, तर स्वतःच्या कार्याच्या जोरावर त्यांनी समाजात स्थान निर्माण करावे,’’ असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी बाबा आमटे यांच्या कार्याचा दाखला देत विकास आणि प्रकाश आमटे यांनीही स्वतःच्या कार्यातून मोठे योगदान दिल्याचे नमूद केले.
‘सामाजिक कार्य करणारे शतकांचा विचार करतात’
‘सरहद’ संस्थेच्या कार्याचे कौतुक करताना गडकरी म्हणाले की, काश्मीरमधील दहशतवादाच्या काळात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांच्या मुलांना आधार देण्याचे महत्त्वाचे काम संस्थेने केले आहे. काश्मीर खोऱ्यात शांतता निर्माण करण्याच्या प्रयत्नांमध्ये संजय नहार यांचे योगदान मोलाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘‘प्रत्येक राजकारणी पुढील निवडणुकीचा विचार करतो; मात्र सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी काम करणारा व्यक्ती शतकानुशतकांचा विचार करतो,’’ असे गडकरी यांनी सांगितले.
‘उत्तम काम केलं तर पोस्टरची गरज नाही’
सामाजिक कार्याची ताकद सांगताना गडकरी म्हणाले की, चांगले आणि प्रभावी काम केल्यास त्याच्या प्रसिद्धीसाठी पोस्टर किंवा मोठमोठे कटआऊट लावण्याची गरज भासत नाही. लोकांच्या मनात निर्माण झालेली विश्वासाची भावना हीच त्या कामाची खरी ओळख ठरते.
‘जातींचे सेल करून उपयोग नाही’
राजकीय पक्षांमध्ये जातींच्या आधारावर तयार करण्यात येणाऱ्या सेलवरही गडकरी यांनी भाष्य केले. जात, पंथ, धर्म आणि भाषेच्या नावावर राजकारणात निर्माण केला जाणारा बागुलबुवा फारसा उपयोगाचा नसल्याचे त्यांनी म्हटले.
‘‘मी स्वतः पक्षाचा अध्यक्ष असताना विविध जातींचे सेल तयार केले. निवडणूक जिंकण्यासाठी त्या वेळी जे आवश्यक वाटले, ते केले. मात्र, नंतर मला जाणवले की हे सगळे फार काळ टिकणारे नाही. शेवटी हे तकलादूच ठरते,’’ अशी कबुलीही गडकरी यांनी दिली.