Skip to content
Menu

इचलकरंजीतील विरोधी पक्षांचे अस्तित्व संपले काय ? रेल्वे प्रश्नावर विरोधी पक्ष उदासीन का ?

August 25, 2026
मुख्य बातम्या

इचलकरंजी – इचलकरंजीचा रेल्वे प्रकल्प रद्द झाला, यावर रेल्वे कृती समितीने प्रचंड संताप व्यक्त करत विद्यमान खासदार व आमदार यांच्यावर आगपाखड केली. तरीही या रेल्वेसाठी इचलकरंजीतील विरोधी पक्ष अजूनही मुग गिळून गप्प आहेत. रेल्वे प्रकल्प रद्द झाला ही बातमी समजल्यानंतर या विरोधी पक्षांनी आपली ताकद दाखवणे गरजेचे होते. पण, तसे झाले नाही, याचाच अर्थ इचलकरंजीतील विरोधी पक्षांचे अस्तित्व संपले की काय? अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे.
इचलकरंजीच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांच्या व अन्य प्रश्नांवर टिकेची झोड उठविणारे विरोधी पक्षाचे नेते रेल्वेच्या प्रश्नावर अजूनही गप्प आहेत. ते अचानक शांत का झाले? हे मात्र गुलदस्त्यात राहिले आहे. रेल्वे प्रश्नावर शहरातील विरोधी पक्ष उदासीन असल्याने त्यांच्या या कार्यपध्दतीबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
इचलकरंजीच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचा असलेला हातकणंगले-इचलकरंजी हा ८ कि.मी. चा रेल्वे मार्ग रखडलेला असताना व आता नुकताच हा प्रकल्प रद्द होण्याच्या मार्गावर असताना विरोधी पक्षांची नेमकी भूमिका काय? हे मात्र अजूनही समजले नाही. शहरातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, उद्योजक आणि कापड उद्योगासाठी अत्यंत महत्वाचा व एक धागा जुळवणारा हा रेल्वेचा प्रश्न सध्या गाजत असताना विरोधी पक्षांनी यावर आक्रमक भूमिका घेण्याची गरज होती. मात्र, ती तशी दिसत नाही. रस्ते, पाणी, इतर स्थानिक प्रश्नावर प्रसिध्दी मिळविण्यासाठी हे विरोधी पक्षांचे नेते पुढे येतात, मग रेल्वेचा प्रश्न जवळपास रद्द होण्याच्या मार्गावर असताना ते कोठे गायब झाले? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. रेल्वे कृती समितीतर्फे सातत्याने पाठपुरावा सुरु असताना निवेदने, तक्रारी आणि आंदोलनाच्या माध्यमातून हा प्रश्न वेळोवेळी निदर्शनास आणून दिला. मात्र, विरोधी पक्ष कोणताही ठोस असा दबाव टाकत नसल्याने इचलकरंजीत नाराजी व्यक्त होत आहे. सत्ताधार्‍यांना प्रश्न विचारणे सोपे असते पण, शहराच्या भवितव्याचा प्रश्न असलेल्या रेल्वेसाठी रस्त्यावर उतरायची वेळ आली की या विरोधकांचे मौन का? यामुळे विरोधी पक्षांनी आता रेल्वे प्रश्नासाठी एकत्रितपणे आवाज उठविणे गरजेचे आहे. तरच त्यांचे अस्तित्व अद्यापही शिल्लक असल्यासारखे वाटेल. इचलकरंजीला रेल्वे मिळणे हा राजकीय विषय नसून औद्योगिक आणि आर्थिक विकासाशी निगडीत प्रश्न आहे. म्हणूनच विरोधकांची आक्रमक भूमिका ही तितकीच महत्वाची आहे.

इचलकरंजीतील विरोधी पक्ष…
राहुल गांधींची राष्ट्रीय काँग्रेस, उध्दव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, मा.क.प., भा.क.प. यांचे शहरात अस्तित्व आहे की नाही? हाच प्रश्न आहे.

स्व. मलाबादेंसारखा विरोधी नेता होणे नाही…
माजी आमदार स्व. कॉ. के. एल. मलाबादे हे निर्भिड विचारसरणीचे होते. त्यांनी विरोधी पक्षनेता कसा असतो हे जिल्ह्यासह महाराष्ट्राला दाखवून दिले. याचबरोबर इचलकरंजी शहराला ज्यावेळी पाणी टंचाई होती त्या काळात शहरात ३०० बोअर खोदल्या व या शहराची तहान भागवली. म्हणून आजअखेर कॉ. के. एल. मलाबादे यांचे नाव घेतले जाते व त्यांची आठवण होते. असा विरोधी नेता या इचलकरंजीला पुन्हा हवा आहे.