Skip to content
Menu

कोलकात्यात हॉटेलला भीषण आग; ९ जणांचा होरपळून मृत्यू

August 19, 2026
देश-विदेश,मुख्य बातम्या

कोलकात्यात हॉटेलला भीषण आग; ९ जणांचा होरपळून मृत्यू
कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे बुधवारी पहाटे एका हॉटेलमध्ये भीषण आग लागून नऊ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका लहान मुलासह बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिर्झा गालिब स्ट्रीट परिसरातील अग्निशमन केंद्राच्या शेजारी असलेल्या हॉटेलमध्ये पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास आग लागली. हॉटेलमधील एका बंद खोलीत आग लागल्यानंतर काही वेळातच मोठ्या प्रमाणात धूर संपूर्ण इमारतीत पसरला.

रात्रीची वेळ असल्याने बहुतांश नागरिक झोपेत होते. धुरामुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास झाला आणि काही जण बेशुद्ध पडले. गुदमरल्यामुळे नऊ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारासाठी आले अन् काळाचा घाला
मृतांपैकी काही जण बांगलादेशचे नागरिक होते. वैद्यकीय उपचारासाठी ते कोलकात्यात आले होते. मात्र, हॉटेलमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किट किंवा एसीमध्ये झालेल्या बिघाडामुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.

दरम्यान, या दुर्घटनेची चौकशी सुरू असून आग नेमकी कशामुळे लागली, तसेच हॉटेलमध्ये अग्निसुरक्षेच्या उपाययोजना पुरेशा होत्या का, याचा तपास केला जात आहे.