Skip to content
Menu

मुंबई-बंगळुरू प्रवास अवघ्या ५ तासांत; पुणे-संभाजीनगर अंतर २ तासांत गाठण्याचा गडकरींचा प्लॅन

August 17, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या

मुंबई-बंगळुरू प्रवास अवघ्या ५ तासांत; पुणे-संभाजीनगर अंतर २ तासांत गाठण्याचा गडकरींचा प्लॅन
पुणे परिसरात ६० हजार कोटींचे रस्ते प्रकल्प; सहापदरी महामार्गामुळे महाराष्ट्राच्या दळणवळणाला मोठी चालना

पुणे : पुणे आणि महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर रस्ते प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात या प्रकल्पांची माहिती देताना पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास अवघ्या दोन तासांत पूर्ण करण्याचे आपले स्वप्न असल्याचे सांगितले.

यासाठी सहापदरी महामार्ग विकसित केला जात असून, पुण्यापासून छत्रपती संभाजीनगरमार्गे नागपूरपर्यंतचा प्रवास भविष्यात अधिक जलद होणार आहे. इतका चांगला रस्ता तयार करण्याचे नियोजन आहे की या मार्गासाठी विमान प्रवासाची गरज भासणार नाही, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

पुणे परिसरासाठी ६० हजार कोटींचे प्रकल्प
पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी येत्या काळात मोठ्या प्रमाणावर रस्ते विकासाची कामे केली जाणार आहेत. पुणे आणि परिसरासाठी तब्बल ६० हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची माहिती गडकरी यांनी दिली.

यामध्ये शिरूर-पुणे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ३१ हजार ६०० कोटी रुपयांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

कोणत्या मार्गासाठी किती निधी?
पुण्यातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी विविध मार्गांवर मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. हडपसर-यावत मार्गासाठी ५ हजार २६५ कोटी रुपये, तळेगाव-चाकण-शिक्रापूर या ५३ किलोमीटरच्या मार्गासाठी सुमारे ४ हजार कोटी रुपये आणि शिरूर-संभाजीनगर या १९२ किलोमीटरच्या मार्गासाठी १५ हजार कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित असल्याचे सांगण्यात आले.

याशिवाय खेड-नाशिक फाटा ३० किलोमीटर मार्गासाठी ८ हजार कोटी, रावेत-नऱ्हे मार्गासाठी ६ हजार कोटी आणि पुणे-सोलापूर मार्गासाठी ८ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा समावेश आहे.

मुंबई ते बंगळुरू अवघ्या पाच तासांत?
महाराष्ट्रासह देशातील प्रमुख शहरांमधील कनेक्टिव्हिटी सुधारण्यावरही भर दिला जात आहे. अटल सेतू ते पागोटे चौक आणि पुढे पुण्यापर्यंतच्या मार्गाचा विकास करण्यात येत असून, या दळणवळणाच्या जाळ्यामुळे मुंबईहून बंगळुरूला अवघ्या पाच तासांत पोहोचता येईल, अशी रस्ते व्यवस्था उभारण्याचे नियोजन असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

शिळफाटा-पनवेल तसेच जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या सुधारणेवरही भर देण्यात येत आहे.

रस्त्यांमधील दोष AI शोधणार
भविष्यात महामार्गांच्या देखभालीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. सॅटेलाईटशी जोडलेल्या वाहनांच्या माध्यमातून रस्त्यांवरील खड्डे, तांत्रिक त्रुटी आणि इतर दोष शोधण्याची यंत्रणा विकसित केली जाणार आहे.

दरम्यान, मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ पूर्वीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. चांगल्या दर्जाच्या आणि आधुनिक सुविधांनी युक्त महामार्गांसाठी टोल द्यावा लागेल, असे मतही गडकरी यांनी व्यक्त केले.

या प्रस्तावित प्रकल्पांमुळे पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूरसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होण्याची अपेक्षा आहे.